कपिल वाधवानचा तुरुंगातील मुक्काम वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इक्बाल मिर्ची प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवानला तूर्तास दिलासा देण्यास हायकोर्टाने आज नकार दिला. अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने केलेली अटक बेकायदा असल्याचा दावा करत वाधवान यांची हायकोर्टात केलेल्या याचिकेवर ईडीने उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याने वाधवान यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी काही दिवस वाढणार आहे. सनब्लिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे इक्बाल मिर्चीशी संबंध होते. याच कंपनीला वाधवान यांच्या मंजुरीने डीएचएफएलने 2010-11 मध्ये 2186 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या रकमेचा उपयोग मिर्चीने मनी लॉण्डरिंगसाठी केला. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने कपिल वाधवानला 27 जानेवारी रोजी अटक केली. ही अटक बेकायदा असल्याचा दावा करत कपिल वाधवान याने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एम. बदर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी ईडीच्या वतीने बाजू मांडणारे वकील हितेन वेणेगावकर यांनी वाधवान यांचा दावा फेटाळून लावत त्यांच्या याचिकेला जोरदार विरोध केला.