कराड येथील अपघातात पुण्याचे 2 ठार, 2 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे-बंगळूर महामार्गावर जखिणवाडी (या.कराड) येथे मारूती कारला अज्ञात वाहनांने जोरदार धडक दिली. या अपघातात २ जण जागीच ठार झाले असून ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गुरुवार दि. 3 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

श्रीहरी तुकाराम वाघमारे (वय 48, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), बापूसाहेब खंडेराव कांबळे (वय 50, रा. काळेवाडी, पिंपरी, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अश्‍विनी श्रीहरी वाघमारे (वय 45), रागिनी श्रीहरी वाघमारे (वय 21, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), चालक फुलचंद नवनाथ चतुर (वय 39, रा. गंगानगर फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) अशी जखमींची नावे आहेत.

फुलचंद चतुर हे श्रीहरी वाघमारे, बापूसाहेब कांबळे, अश्‍विनी वाघमारे, रागिनी वाघमारे यांना घेऊन कारमधून पुण्याहून बेळगाव येथे औषध आणण्यासाठी निघाले होते. गुरूवारी पहाटे जखीणवाडीच्या हद्दीत मळाईदेवी पतसंस्थेसमोरील चौकात कारच्या समोरून डाव्या बाजूने आलेल्या अज्ञात वाहनांची कारला जोरदार धडक बसली. यामध्ये श्रीहरी वाघमारे व बापूसाहेब कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अश्‍विनी वाघमारे, रागिनी वाघमारे व चालक फुलचंद चतुर हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात होताच अज्ञात वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पोबारा केला.

अपघाताची माहिती मिळतात कराड शहर अपघात विभागाचे पोलिस हवालदार खलील इनामदार व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांनीही अपघातस्थळी भेट दिली. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. याबाबत कारचालक फुलचंद चतुर यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षरी व्ही. बी. बेरडे करीत आहेत.