कराड – मलकापूरची भाजी मंडई केली बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराड व मलकापूर नगरपालिकेने पुढाकार घेतला असून दररोजची आणि आठवडा बाजार बंद केला आहे. संचारबंदीच्या काळात कोणी उपाशी राहू नये, यासाठी कराड व मलकापूर येथील गरीब कुटुंबीयांचा आणि कामगार वर्गांचा सर्वे सुरू करण्यात आला असून दररोज 725 लोकांना शिवभोजन थाळी मोफत दिली जात आहे.

कराड तहसील कार्यालयात कराड व मलकापूर नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, कराडचे मुख्य अधिकारी रमाकांत डाके, मलकापूरचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर उपस्थित होते.

दरम्यान कराड व मलकापूरमध्ये शिवभोजन थाळी 725 लोकांना मोफत दिली जात आहे. स्थलांतरित कामगार, इतर राज्यातील कामगार यांचा सर्वे करून अद्ययावत यादी तयार करण्यात येत आहे. ज्या लोकांचे हातावरील पोट आहे. अशा लोकांचा सर्वे करून शिवभोजन थाळी वाढवण्याबाबत आणि आवश्यक असेल तर शिवभोजन केंद्रही वाढवण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल अशी माहिती कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.