377च्या निकालानं ऑक्सिजन मिळाला! करण जोहरची पहिली प्रतिक्रिया

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संमतीने स्वीकारलेले समलैंगिक संबंध गुन्हा ठरणार नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर समलैंगिकांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. बॉलिवूडमधील बडी हस्ती दिग्दर्शक करण जोहरने देखील सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं खुल्या दिलानं स्वागत केलं आहे. हा मानवतेचा विजय असल्याचं म्हटलं आहे.

करण जोहरने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली आहे. ज्यामध्ये एलजीबीटी हक्काच्या लढ्यात वापरला जाणारा झेंडा फडकताना दिसत असून त्यावर FINALLY! असं बोल्ड अक्षरात लिहिलं आहे. या फोटोसोबत ‘ऐतिहासिक निकाल!!!! आज अत्यंत अभिमान वाटतो आहे. समलैंगिकतेला मुक्त करणं आणि कलम 377 ला रद्द करणं हा मानवतेचा विजय आहे. देशाला ऑक्सिजन मिळाला आहे’, असं करणने यामध्ये स्पष्टं म्हटलं आहे.

करण जोहर बॉलीवूडमधील बडी हस्ती आहे. त्याच्या सेक्शुअल स्टेटसवर बऱ्याचदा चर्चा होत असते, असं त्यानंच आपलं चरित्र ‘अॅन अनसूटेबल बॉय’ मध्ये म्हटलं आहे. करण या पुस्तकात म्हणतो की, ‘मी कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पण हे मी बोलू शकत नाही. कारण मी अशा देशात राहतो जिथे तशी ओळख दिल्यानंतर मला कैद सुद्धा होऊ शकते’.

आपली प्रतिक्रिया द्या