दोन लाखांवरच्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची नवी योजना आणणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2031

आधीच्या सरकारने शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले होते. मात्र या सरकारने ही रक्कम 50 हजारांनी वाढवून 30 सप्टेंबर 2019पर्यंत पीक कर्जाची थकबाकी असणाऱया सर्व शेतकऱयांना दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली आहे. आधीच्या सरकारप्रमाणे निकषही या सरकारने ठेवलेले नाहीत. असे असताना ज्या लोकांना आता काम राहिलेलं नाही, असे लोक शेतकऱयांना कर्जमुक्ती देणाऱया या योजनेची बदनामी करीत आहेत, अशा शब्दांत विरोधकांना सुनावतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या शेतकऱयांचे दोन लाखांवर कर्ज आहे त्यांच्यासाठी आणि जे नियमित कर्ज परतफेड करीत आहेत अशा शेतकऱयांसाठीही लवकरच योजना आणणार असल्याचे आश्वासन दिले.

ज्या लोकांना काम नाही, त्यांच्याकडून कर्जमुक्तीची योजना बदनाम केली जात आहे

मंत्रिमंडळ विस्तारातील नवीन मंत्र्यांसोबत झालेल्या मंत्री परिषद बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांना शेतकरी कर्जमुक्तीबाबत विचारले असता ते म्हणाले, जी योजना या सरकारने जाहीर केली ती स्पष्ट आहे. त्या योजनेवरून उगाच सरकारला बदनाम करायचे नसते उद्योग ज्यांना आता काम नाही ते लोक करीत आहेत. मी विधानसभेतच बोललो आहे की ज्या शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं कर्ज थकित आहे त्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जातून मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याचप्रमाणे आणखी एक घोषणा केली आहे की, दोन लाखांवरचं जे कर्ज आहे. त्याचप्रमाणे जे नियमित कर्ज परतफेड करीत आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी योजना करीत आहोत. हे वेगळं वेगळं करण्यामागचं कारण म्हणजे अंदाज न घेता एखादी घोषणा केली आणि ते जर नाही करता आलं तर दिलेला शब्द फिरवणं हे शिवसेनेचं काम नाही. अवकाळी पावसाबद्दल शेतकऱ्यांना मदत वितरीत केली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

खातेवाटपाविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आमचं खातेवाटप एकमेकांच्या समजुतीने केलं आहे. उद्या त्यावर निर्णय होईलच. खातेवाटप पक्षाप्रमाणे झालेलं आहे. त्यानुसार उद्या किंवा परवापर्यंत आम्ही ते आमच्या मंत्र्यांना देऊ. यावेळी सरकारी खाती ऑक्सिस बँकेतून राष्ट्रीयीकृत बँकेत वळविण्याबाबत विचारले असता; आज पहिल्यांदा शपथ घेतली आहे त्यांचे खातेवाटप होऊदे. मग कोणती खाती कुणाच्या वाटय़ात आहेत ते बघूया आपण. सर्व खात्यांत माझा ऍक्सेस आहेच; अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली. गृह खात्याच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही एकमेकांमध्ये काय ते ठरवू. त्यांच्याकडे खातं जरी दिलं तरी काय फरक पडणार आहे. एकदा मिळून काम करायचं ठरवलं की ठरवलंच तर मिळून काम करणार.

  • महिलांना शिवसेनेच्या मंत्रिमंडळात स्थान नसल्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, यावरून महिलांच्या बाबतीत गंभीर नाही आहोत असे नाही. महिलांवर जे अत्याचार वाढताहेत त्याबाबत कठोरात कठोर कायदा आंध्रमध्ये आणला आहे. त्याची माहिती आम्ही घेत आहोत. त्यानुसार तसाच्या तसा कायदा आणायचा की त्यापेक्षा अधिक चांगला कायदा आणायचा हे आम्ही पाहत आहोत.

माझ्याकडे कुणाची नाराजी आलेली नाही

मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमदार नाराज आहेत, असे विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, समारंभात कोणी दिसलं नाही म्हणून कोण नाराज कसा असू शकतो? माझ्याकडे कुणाची नाराजी आलेली नाही. या गोष्टी थोडय़ाफार फरकाने होत असतात. मंत्रिमंडळात येण्याची सर्वांची इच्छा असू शकते पण हे तीन पक्ष अधिक मित्रपक्षांचं सरकार आहे. त्यामुळे सर्वच गोष्टींना मर्यादा येत असतात.

आपली प्रतिक्रिया द्या