
गावात दहशत निर्माण करण्यासाठी धारदार कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे तालुक्यातील चांदे बुद्रूक गावातील एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, केक कापण्यासाठी वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे.
हृषिकेश भाऊसाहेब गावडे (वय 21) असे या बर्थ डे बॉयचे नाव आहे. चांदे बुद्रूक येथील हृषिकेश गावडे या तरुणाने त्याच्या वाढदिवसाला मित्रांना बोलावून वाढदिवसाचा केक राहत्या घरी चक्क धारदार कोयत्याने कापला. त्यानंतर बर्थ डे बॉयने तोच कोयता घेऊन कोणाला गळ्याला लावून, तर कोणाच्या गळ्यावर वेगळ्या स्टाइलने पकडून फोटो काढले. नागरिकांमध्ये दहशत निर्माण होईल, अशा पद्धतीने फोटो काढून समाजमाध्यमांवर प्रसारित केले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने घटनास्थळी भेट देऊन संबंधित तरुणाच्या गाईच्या गोठय़ातून कायदा हस्तगत केला आहे. आता या बर्थ डे बॉयवर कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस नाईक शाम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम आदींनी ही कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मित्र जमवून धारदार शस्त्र्ाांनी केक कापणे हे तरुणाईचे सध्या फॅडच बनले आहे. मात्र, असे कृत्य करणे गुन्हा आहे, हे माहीत असतानाही अनेक तरुण दहशत माजवण्यासाठी व भाईगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी असे प्रकार घडवतात. हे तरुण एवढय़ावरच न थांबता केक कापत असतानाचे व्हिडीओ, फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करतात. भाईगिरी, दहशत आदी गैरप्रकारांमध्ये युवा पिढीने अडकू नये. नागरिकांना धमकवण्यासाठी व त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी मोठी गर्दी करून शस्त्र्ाांचा वापर करून अशा घटना घडवल्या जातात. मात्र, अशा प्रकारांवर कर्जत पोलिसांचा ‘वॉच’ आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधिताची व कुटुंबाची बदनामी होते, त्यामुळे युवकांनी अशा चुकाच करू नयेत.





























































