
घरफोडीच्या तयारीत असणाऱया टोळीला गजाआड करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. यातील दोनजणांना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, दोघा अल्पवयीनांना श्रीरामपूर येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
मुर्गेश गोविंद नायर (वय 40, रा. नागपूर चाळ, येरवडा, पुणे), मोहसिन बिलाल सय्यद (वय 32, रा. येरवडा, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. त्यातील एक पथक शिंदेवाडी रस्त्याने महिजाळगावकडे जात असताना हॉटेल समृद्धीजवळ एका कारमध्ये चारजण संशयास्पदरीत्या बसलेले दिसून आले. पथकाने त्यांची चौकशी करून तपासणी केली असता घरफोडीसाठी लागणारी लोखंडी कटावणी, लोखंडी कुकरी, एक मूठ आणि एक कव्हर असलेला चाकू अशी शस्त्र्ाs सापडली. त्यामुळे पोलिसांनी दोन अल्पवयीनांसह चौघांना ताब्यात घेऊन दोघांना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, किरण साळुंके, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम यांनी ही कारवाई केली आहे.





























































