
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
गरिबांचा देव म्हणून ख्याती असलेल्या श्री विठ्ठलाला एका भक्तांनी 73 तोळे सोन्याचा चंद्रहार अर्पण केलाय या हाराची किंमत 37 लाख रुपये इतकी आहे. कानडा विठ्ठलू कर्नाटकू या अभंगाची प्रचिती यानिमित्ताने येते. कारण 37 लाख रुपयांचे सोने दान करणारा दानशूर भाविक हा कर्नाटक राज्यातील बेंगळुरूचे असून त्यांचे नाव एन.जी. राघवेंद्र राव व बिपीन जलाणी असे आहे.

हॉटेल व्यवसाय करणाऱ्या या भक्तांनी गरिबांचा देव म्हणून ओळख असलेल्या विठुरायाच्या चरणी वाहिलेला हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा दागिना आहे. श्री लक्ष्मीचे चित्र असलेला हा चंद्रहार अतिशय सुबक कलाकुसरीचा आहे. देवाच्या खजिन्यात अनेक अनमोल असे दागिने आहेत यात या चंद्रहाराची भर पडली आहे. धनशूर भक्तांने आपल्या हातांनी देवाच्या गळ्यात हा हार घातल्यानंतर देवाचे लोभस रुप अधिकच खुलून दिसत होते.



























































