कर्नाटकात मुस्लिमांना ओबीसी आरक्षण लागू

कर्नाटकात मुस्लिमांच्या अनेक पोटजातींना ओबीसी आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे कर्नाटकात मुस्लीम आरक्षणावरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये ओबीसींना 32 टक्के आरक्षण लागू आहे. त्यातील एका प्रवर्गात सर्व मुस्लीम पोटजातींना समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे कर्नाटकमधील सर्व मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळालं आहे.

कर्नाटकात 32 टक्के ओबीसी आरक्षण लागू आहे. यात पाच वर्ग आहेत. 1, 2A, 2B, 3A आणि 3B अशी ही वर्गवारी केलेली आहे. यातील पहिल्या वर्गात 391 जाती असून त्यात मुस्लिमांच्या 17 जातींचा समावेश आहे. या वर्गात 4 टक्के आरक्षण मिळतं. तर 2A वर्गवारीत 393 जातींपैकीस 19 जाती मुस्लीम आहेत. या वर्गात 15 टक्के आरक्षण मिळतं. 2B या तिसऱ्या वर्गात मुस्लिमांच्या सर्व जाती अंतर्भूत असून या वर्गाला 4 टक्के आरक्षण लागू आहे.

तर उर्वरित 3A वर्गाला 4 टक्के तर 3B वर्गाला 5 टक्के आरक्षण मिळणार आहे. या हिशोबाने कर्नाटकमध्ये एकूण 883 जातींना आणि पोटजातींना ओबीसी आरक्षण मिळतं. या आरक्षणाचा फायदा त्यांना सरकारी नोकऱ्या तसंच सरकारी शिक्षण संस्थांमध्ये होतो. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानुसार, कर्नाटकात मुस्लिमांची संख्या ही राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 12.92 टक्के इतकी आहे. 30 मार्च 2002 ला कर्नाटकच्या तत्कालीन सरकारने आदेश जारी करून मुस्लिमांसाठी ओबीसी प्रवर्गात आरक्षण मंजूर केलं होतं.