कर्नाटकातून आलेल्या 64 कामगारांना शिरोळ तालुक्यात अडवले

261

कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील राजस्थान आणि मध्य प्रदेशचे 64 कामगार आपल्या गावी जाण्यासाठी भटकत आले होते. मात्र जुने दानवाड (ता. शिरोळ) येथे पोलिसांनी त्यांची माहिती घेऊन त्यांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिले. एकसंबा (ता. चिकोडी) येथील एका नगरसेवकाने या कामगारांना जेवण देऊन व त्यांची तपासणी करून त्याचा अहवाल चिकोडीच्या तहसीलदारांकडे पाठवला आहे.

बेंगलोर येथील फरशी फिटिंग करणारे 13 राजस्थानी कामगार व मध्य प्रदेशचे अन्य 51 अशा 64 कामगारांना काम नसल्याने ते आपल्या गावी परतण्यासाठी बेंगलोरहून 600 किलोमीटरचा पायी प्रवास करत चिकोडी-एकसंबामार्गे जुने दानवाडपर्यंत आले होते. बळ्ळारी येथे त्यांची आरोग्य तपासणी करून सोडले होते. चिकोडीवरून ते विजापूरकडे जाणार होते. मात्र चिकोडीतून कागवाडकडे जाण्याऐवजी ते एकसंबामार्गे जुने दानवाडकडे आले होते. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना कर्नाटक सीमेवरच अडवले. माहिती घेतल्यानंतर एकसंबा येथील नगरसेवकाने त्यांची जेवणाची व्यवस्था केली. यानंतर त्यांना कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

जयसिंगपुरात विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई
जयसिंगपूर पोलिसांनी लॉकडाऊनची अंमलबजावणी कठोरपणे सुरू केली आहे. यामुळे मंगळवारी दिवसभरात संचारबंदीचा आदेश झुगारून शहरात मोटारसायकलवरून फिरणार्‍या पाचजणांवर जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई केली.

विजय मछले (वय 35, जयभवानी चौक, शाहूनगर), मोहाज बोरकर (वय 28, गल्ली क्र. 8), कन्हैय्या कापडिया (वय 24, गल्ली क्र. 3), मुनाफ नदाफ (वय 23, मच्छी मार्केट), दिग्विजय चव्हाण (वय 23, मौजे आगर), संजय कमते (वय 41, रा. अवचितनगर) अशी त्यांची नावे आहेत. हे पाचजण वेगवेगळ्या ठिकाणी शहरातून विनाकारण मोटारसायकल घेऊन फिरत असल्याने कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या