
महिला आयपीएस अधिकाऱ्याला काँग्रेसचा पाळीव कुत्रा म्हणणे कर्नाटकातील हरीहर येथील भाजप आमदार बीपी हरीश यांना भोवले आहे. त्यांच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भाजप आमदाराविरुद्ध कलम 132, 351(1) आणि 79 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दावणगेरे शहरात आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना भाजप आमदार बीपी हरीश यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक उमा प्रशांत यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. मी आमदार आहे. मात्र पोलीस अधीक्षक उमा प्रशांत मला कुठल्याही कार्यक्रमात पाहतात तेव्हा विचित्र चेहरा करतात, असे भाजप आमदार म्हणाले. तसेच एसपी काँग्रेस नेते शमनूर यांच्या कुटुंबातील सदस्यांची गेटवर वाट पाहात उभ्या राहतात आणि त्यांच्या घरातील पाळीव पॉमेरेनियन कुत्र्याप्रमाणे वागतात, असेही ते म्हणाले.
शमनूर शिवशंकरप्पा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विद्यमान आमदार आहेत. त्यांचा मुलगा एसएएस मल्लिकार्जुन कर्नाटक सरकारमध्ये मंत्री आहे. तर मल्लिकार्जुन यांची पत्नी प्रभा मल्लिकार्जुन दावणगेरे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
भाजप आमदार हरीश पुढे म्हणाले की, मी हरीहर येथील एका कार्यक्रमात गेलो तेव्हा एसपींनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले आणि कोणतेही आदरातिथ्य न करता मंचावर बसल्या. दुसरीकडे खासदार प्रभा मल्लिकार्जुन यांची वाट पाहात त्या कडक उन्हात उभ्या राहिल्या.
दरम्यान, एसपी उमा प्रशांत यांच्या तक्रारीनंतर केटीजे नगर पोलीस स्थानकामध्ये भाजप आमदार बीपी हरीश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.