कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट, जीएसटी परताव्याची केली मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आहे. बोम्मई यांनी दिल्लीवारी दरम्यान ही भेट घेतली असून या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे जीएसटीचा परतावा मागितल्याचं बोम्मई यांनी सांगितले. आपण गेल्यावर्षीचा जीएसटी परतावा मागितलाच आहे शिवाय या वर्षीचाही परतावा मागितला असल्याचं बोम्मई यांनी सांगितले.

जीएसटी परिषदेत अजित पवार यांची केली होती थकबाकी देण्याची मागणी

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. राज्याचे अर्थचक्र सावरण्यासाठी मागील आर्थिक वर्षातील जीएसटी थकबाकी पोटी केंद्राकडून महाराष्ट्राला येणे असलेली 24 हजार कोटी रुपयांची जीएसटीची थकबाकी त्वरीत मिळावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे यापूर्वीच केली आहे. मे महिन्यात 43 वी जीएसटी परिषद आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने केंद्राकडे आग्रही मागण्या केल्या होत्या. जीएसटीच्या थकबाकीबाबत त्यांनी केंद्राकडे जोरदार मागणी केली होती. 2020-21साठी महाराष्ट्र राज्यास जीएसटी कराची भरपाई सुमारे रुपये 46 हजार कोटी रुपयांची होती.आतापर्यंत राज्याला फक्त 22 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षाची सुमारे 24 हजार कोटींची भरपाई राज्यास मिळणे बाकी आहे.

ब्लॅक फंगसवरील औषधाला करातून सूट

या जीएसटी बैठकीमध्ये ब्लॅक फंगसवरील औषधे करातून सूट असलेल्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या औषधांवर 31 ऑगस्ट 2021 पर्यंत कर आकारला जाणार नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली होती. कोरोना विषाणू संसर्गाशी निगडित मदत, बचाव वस्तूंवरील सूट 31 ऑगस्ट 2021 पर्यंत कायम राहणार आहे.