
कर्नाटकचे नागरी हक्क अंमलबजावणी विभागाचे पोलीस महासंचालक (DGP) के. रामचंद्र राव यांना राज्य सरकारने तडकाफडकी निलंबित केले आहे. राव यांचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
सोमवारी सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यात के. रामचंद्र राव हे त्यांच्या कार्यालयात महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच काही ऑडिओ क्लिप देखील समोर आल्या आहेत. या कृत्यामुळे सरकारी कर्मचाऱ्याच्या वर्तवणुकीच्या नियमांचे उल्लंघन झाले असून सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे, असे ताशेरे ओढत सरकारने त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
निलंबन आदेशानुसार, जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत राव यांना राज्य सरकारच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. ‘प्रथमदर्शनी पुरावे पाहता, राव यांचे कृत्य शिस्तभंगास पात्र असून चौकशी प्रलंबित ठेवून त्यांना निलंबित करणे आवश्यक आहे’, असे अधिकृत पत्रात म्हटले आहे.
रामचंद्र राव यांनी आरोप फेटाळले
दरम्यान, के. रामचंद्र राव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘हे व्हिडिओ बनावट असून माझी बदनामी करण्याचे हे कारस्थान आहे. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून काहीही केले जाऊ शकते’, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी गृहमंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणी कडक भूमिका घेतली आहे. ‘कायदा सर्वांसाठी समान आहे. तो अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपने देखील या घटनेचा तीव्र निषेध केला असून, ही घटना पोलीस दलासाठी लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.
रामचंद्र राव आणि वाद
रामचंद्र राव हे १९९३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्या सावत्र मुलीला (अभिनेत्री रान्या राव) सोन्याच्या तस्करी प्रकरणात मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. त्या वेळी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते, मात्र नंतर त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले होते.
Karnataka DGP K Ramachandra Rao Suspended Over Viral Sleazy Videos
Karnataka DGP K Ramachandra Rao has been suspended following the viral spread of objectionable videos. Chief Minister Siddaramaiah warned of strict disciplinary action.
Keywords: k ramchandra rao suspended, karnataka dgp viral video, ips officer suspension, karnataka police news, dgp civil rights enforcement, siddaramaiah action, karnataka crime news


























































