करोना उद्रेक – धसका नको, तयारी हवी

230

>> डॉ. प्रदीप आवटे

चीनमध्ये करोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आत्तापर्यंत 17 जणांना जीव गमवावा लागला आहे. 400 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. चीनमध्ये वेगाने हा व्हायरस पसरल्यानंतर आता हिंदुस्थान, अमेरिकेसहीत अनेक देशांमध्ये या व्हायरसबाबत ऍलर्ट देयात आला आहे. कमी कालावधीत या आजाराचा संसर्ग होत असल्याने याचे गांभीर्य ओळखणे गरजेचे आहे.

पुन्हा नवी साथ, पुन्हा नवा आजार! यावेळी या नव्या आजाराचं कारण आहे नवा करोना विषाणू. 31 डिसेंबर 2019, जुन्या वर्षाचा शेवटचा दिवस. चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरात न्यूमोनियाच्या खूप साऱया केसेस सापडल्या. प्रयोगशाळेने याचं कारण दिलं करोना विषाणू!

करोना विषाणू म्हणजे काय?
करोना हे खरं म्हणजे विषाणूच्या एका समूहाचं नाव आहे. समान वैशिष्टय़े असणाऱया आणि साधारणपणे एकसारखे गुणधर्म असणारे विविध विषाणू एका समूहामध्ये समाविष्ट केले जातात. करोना हा असाच एक विषाणू समूह. साध्या सर्दी, खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्स यांसारख्या गंभीर आजारांसाठी करोना विषाणू कारणीभूत असतात, परंतु यावेळी वुहान शहरात जो करोना विषाणू आढळून आला तो मात्र यापूर्वी आढळलेल्या सहा-सात प्रकारच्या करोना विषाणूपेक्षा वेगळा आहे. कारण त्याची जनुकीय रचना इतर कोणत्याही पूर्वीच्या करोना विषाणूशी मिळतीजुळती नाही. त्यामुळेच या नव्या विषाणूला नोवेल करोना व्हायरस 2019(nCov) असे नामाभिधान प्राप्त झाले.

आंतरराष्ट्रीय परिस्थिती
सध्या करोनाबाबत चीनमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याबाबत दोन-तीन प्रकारचे अहवाल उपलब्ध होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडील याबाबतीतील आकडेवारी अद्ययावत व्हायला काही काळ लागतो आहे. मात्र सुरुवातीला अत्यंत सौम्य आणि मंदगतीने पसरणारा हा करोना विषाणू हळूहळू वेग धारण करताना दिसत आहे. ताज्या माहितीनुसार चीनमध्ये नवीन करोना विषाणूचे चारशेहून अधिक रुग्ण आढळले असून जवळपास 17 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये वुहान शहर ओलांडून बीजिंग आणि इतर काही शहरी भागातही या आजाराचा प्रसार होताना दिसतो आहे. त्याचबरोबर जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्ये ही या नवीन करोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. दिनांक 22 जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेने एका विशेष बैठकीत नवीन करोना विषाणू उद्रेकाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यविषयक आपत्ती घोषित करण्याची पद्धत इतपत गंभीर नाही ना याची चाचपणी केली आहे. अजून तरी अशा प्रकारची आपत्ती जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेली नाही.

नवीन करोना विषाणू हिंदुस्थानात येऊ शकतो काय ?
खरं म्हणजे वाढत्या आंतरराष्ट्रीय दळणवळणामुळे आणि जागतिकीकरणाच्या रेटय़ामुळे संपूर्ण जग हे एक ग्लोबल व्हिलेज झाले आहे. त्यामुळे साथींच्या रोगांच्या बाबतीत बोलावयाचे तर जगाच्या एका टोकाला असणारा कोणताही संसर्गजन्य आजार जगाच्या दुसऱया टोकाला पोहोचायला फारसा वेळ लागत नाही. नवीन करोना विषाणूबाबतही हे तितकेच खरे आहे. हिंदुस्थानचे चीनसोबत व्यापार, संस्कृती आणि शिक्षणविषयक उत्तम संबंध आहेत. ज्या वुहान शहरामध्ये हा करोना उद्रेक सुरू झाला, त्या शहरातच किमान सातशे ते आठशे हिंदुस्थानी विद्यार्थी वैद्यकीय तसेच इतर शिक्षणासाठी राहत आहेत. सध्या सुट्टी असल्याने यातली बरीच मुले आपल्या गावी परतत आहेत. या मुलांची वैद्यकीय शिक्षणाची पार्श्वभूमी आणि आणि ती जिथे शिकत आहेत, त्या शहरातली साथीच्या रोगाची परिस्थिती लक्षात घेता नवीन करोना विषाणू हिंदुस्थानपर्यंतदेखील येऊ शकतो ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही. सुरुवातीच्या काळात या विषाणूची मनुष्यापासून मनुष्यास प्रसार होण्याची क्षमता मर्यादित आहे असे निरीक्षण होते. तथापि मागील आठवडय़ात हाती आलेल्या माहितीनुसार रुग्णांना उपचार देणाऱया हॉस्पिटल स्टाफपैकीदेखील अनेक जण या आजाराने प्रभावित झाल्याचे दिसून आले असून त्यामुळे हा आजार मनुष्यापासून मनुष्यास होऊ शकतो हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.

करोना प्रतिबंधासाठी आपण काय करत आहोत?
नवीन करोना विषाणूच्या उद्रेकाची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने याबाबतीत तातडीची पावले उचलली आहेत. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, हैदराबाद, चेन्नई, बंगलोर आणि कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर करोनाबाधित देशातून येणाऱया प्रवाशांचे थर्मल क्रीनिंग सुरू करण्यात आले आहे. हिंदुस्थानच्या दक्षिणेकडील राज्यांतील बऱयापैकी मुले वैद्यकीय आणि इतर शिक्षणासाठी चीनमध्ये असल्याने दक्षिणेकडील राज्यांतील विमानतळांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला दिसून येतो. यासोबतच या नवीन आजाराचे निदान करण्याच्या सुविधा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे तसेच देशभरातील इतर 12 प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध करण्यासाठी आवश्यक पावले ताबडतोब उचलण्यात आली आहेत. विमानतळावरील क्रीनिंगमध्ये बाधित क्षेत्राला भेट देऊन येणारे जे प्रवासी आढळत आहेत त्यांची माहिती संबंधित राज्यांना आणि जिह्यांना देण्यात येत आहे. त्या माध्यमातून या व्यक्तींचा पुढील किमान 28 दिवसांकरिता दैनंदिन पाठपुरावा करण्यात येत आहे. याशिवाय विमानतळावरील स्कॅनिंगमध्ये जर काही व्यक्तींना करोना विषाणूची संशयित लक्षणे आढळली तर त्यांना विलगीकरण कक्षात भरती करण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.

करोना विषाणू आजाराची लक्षणे
ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेचे निगडित असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, न्यूमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे मुख्यत्वेकरून आढळतात.

करोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा?
करोना विषाणूमुळे होणारा आजार नेमका कसा पसरतो याबाबत अजून बरीचशी संदिग्धता असली तरी सर्वसाधारणपणे हा आजार हवेवाटे शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. करोना विषाणूचे मूळ स्थान प्राणी जगतात आहे. 2012 वर्षी पसरलेला मर्स हा आजार उंटाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होताना आपण पाहिले, तर 2003 च्या सार्समध्ये विशिष्ट जातीचे मांजर तसेच वटवाघूळ यांची काही भूमिका होती.

आपण काय करावे?
हवामानातील बदल आणि इतर कारणामुळे नवनवे आजार येत राहणार आहेत. आपण करोना विषाणूचा धसका घेण्याचे कारण नाही. मात्र समाज आणि व्यक्ती म्हणून आपली अशा संकटांना तोंड देण्याची तयारी मात्र हवी. समाज म्हणून आपण आपली सर्वेक्षण यंत्रणा, निदान व उपचार सुविधा, विलगीकरण कक्ष, आरोग्य शिक्षण, क्षमता संवर्धन यासाठी योग्य ती पावलं उचलत आहोत. व्यक्ती म्हणूनही आपल्याला काही करावे लागेल. करोना, स्वाईन फ्लू, टीबी यांसारखे सगळेच आजार हे हवेवाटे शिंकण्याखोकण्यातून जे थेंब उडतात त्यातून पसरतात. म्हणून आपण शिंकताना, खोकताना हातरुमाल नाकातोंडावर धरणे, हात वारंवार धुणे असे साधेसुधे नियम पाळून हे आजार दूर ठेवू शकतो. करोना हा प्राणिजन्य विषाणू आहे हे लक्षात घेतले तर मांसाहार घेणाऱयांनी पूर्णपणे शिजलेले आणि आरोग्यदायी मांस खाणे आवश्यक आहे.

मुळात प्राणी, मनुष्य आणि पर्यावरण यांचे आरोग्य हे परस्परांवर अवलंबून आहे ही वन हेल्थ संकल्पना आपण केवळ समजून घेऊन चालणार नाही, त्यानुसार आपल्याला वागावेदेखील लागेल. म्हणूनच करोना आजाराचा धसका नको, पण अशा प्रकारच्या उद्रेकासाठी आपण सर्व बाजूंनी तयार असणे आवश्यक आहे.

(लेखक महाराष्ट्र आरोग्य सेवेत राज्य सर्वेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या