भटकंती – करपाका विनायक

>> प्रा. वर्षा चोपडे

देशात आणि विदेशात अनेक गणेश मंदिरे आहेत. पण काही मंदिरे खास असतात. कारण त्या मंदिरांची बांधकाम शैली आणि आकर्षक मूर्ती भक्तास नतमस्तक होण्यास भाग पाडतात. यापैकी करपाका विनायक मंदिर पिल्लैयर पट्टी, थिरुपत्तूर, तामीळनाडू येथील गणेश मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. हे मंदिर मदुराई शहराच्या ईशान्येस सुमारे 75 किलोमीटर आणि तामीळनाडूमधील कराईकुडी शहराच्या वायव्येस 15 किलोमीटर अंतरावर आहे.

पिल्लैयर हे गणेशाचे तामीळ नाव आहे त्याचा अर्थ ज्ञानाचा स्वामी असा होतो. मंदिराचा इतिहास 2500 वर्षांहून अधिक जुना आहे. हे गणपतीला समर्पित प्राचीन दगडी मंदिरांपैकी एक आहे. मंदिराच्या दगडांवर सापडलेल्या आगम ग्रंथानुसार ते 1091 ते 1238 च्या दरम्यान बांधले गेले असावे. तथापि, चौथ्या शतकापूर्वीचे वेगवेगळे शिलालेख आहेत, त्यामुळे हे मंदिर केव्हा बांधले गेले याची कोणतीही अचूक तारीख नाही. कारण आपल्याला विमानम, राजगोपुरम, भाषाशैली यांसारखे विविध पुरावे आढळतात. प्राचीन सुबक नक्षीकाम आणि भव्य मंदिर डोळ्याचे पारणे फेडते.

भगवान करपाका गणेशाची सोंड उजवीकडे वळवलेली आहे आणि मूर्ती दोन हात, दोन पाय या रूपात आहे. गणपती मूर्ती सहा फूट उंच असून भव्य आहे. या मूर्तीला दगडात बनवले आणि गर्भगृहात तिची स्थापना केली आहे. संपूर्ण मूर्तीला सोन्याने मढवलेले असल्यामुळे भक्तांना प्रदक्षिणा घालता येत नाही. बाजूला पाण्याचे भलेमोठे तळे आहे. पवित्र स्नान केल्यावरच मंदिरात दर्शन घ्यावे असा नियम आहे. पण हा नियम आता फारसा पाळला जात नाही. या प्राचीन दगडी मंदिराबाबत विद्वान म्हणतात की, भगवान विनायक हा बुद्धीचा देव आहे. विनयागर करपगम वृक्षा (कल्पवृक्ष-आपल्या इच्छेनुसार काहीही देऊ शकणारे एक स्वर्गीय वृक्ष) प्रमाणे त्याच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो म्हणून त्याला ‘करपगा विनायक’ असेही म्हणतात. पाय दुमडलेला आणि पद्म आसनात जमिनीला तळव्यांचा स्पर्श न करता बसलेला दिसतो. विनायक या शब्दाचा अर्थ आहे ‘अतुलनीय नेता’. ज्या ‘सिरपी’ने म्हणजे शिल्पकाराने ही मूर्ती तयार केली होती, त्यांनी त्याचे नाव मूर्तीजवळ ‘एकतूर कोन पररूपण’ असे कोरले आहे. इतिहासकारांचे म्हणणे आहे की लेखनशैली आणि वापरलेली तमिळ अक्षरे ‘तमिझी’ प्रकार म्हणून ओळखली जातात, जी इ.स.पू. पाचव्या शतकात वापरली जात होती. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या वलंबूरी विनायकाची पूजा करणाऱया या भक्तानुसार गणपती नवसाला पावणारा आणि इच्छापूर्ती करणारा आहे.

पशुपतिश्वरांचे शिल्प, ‘भगवान शिवाला दूध अर्पण करणारी गाय’ हे या मंदिराचे वैशिष्टय़ आहे. या मंदिरात धनाचा स्वामी कुभेरन यांनीही पूजा केली होती. तसेच अध्यात्मात भर घालणारी देवी लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गाईला या मंदिरात विशेष स्थान आहे. इतर ठिकाणांप्रमाणे तिरुवीसर, मरुधीसर आणि सेंचडेश्वरर आणि तीन देवी शिवगामी अम्मन, वदमलार मंगाईममन आणि सौंदरा नायगा अम्मान हे तिन्ही लिंगम एकाच ठिकाणी दिसतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. यात्रेकरूंना पाणी पुरवण्यासाठी मंडपमच्या आत एक मंदिर विहीर आहे. असे मानले जाते की या मंदिरात काथ्यायिनी अम्मनची पूजा केल्याने स्त्रिया दोषापासून मुक्त होतात. या अत्यंत पुरातन मंदिरामध्ये 15 हून अधिक शिलालेख आढळतात, यावरून मंदिर किती पुरातन आहे हे कळते. करपाका विनायक मंदिर हे दक्षिण हिंदुस्थानातील पांडय़ा राजवंशाच्या योगदानाची साक्ष आणि पुरावा आहे. हे मंदिर चेट्टियार, व्यापारी आणि व्यापारी समुदायाच्या नऊ वडिलोपार्जित हिंदू मंदिरांपैकी एक आहे. त्याची देखभाल चेट्टियार ट्रस्ट (नगररथर्स) करतात, विनायक चतुर्थी उत्सव येथे दहा दिवस साजरा केला जातो. नवव्या दिवशी रथोत्सव आणि शोभा मिरवणूक काढली जाते. प्रसन्न, शांत वातावरण आणि मोहक गणेश मंदिरात गणपती प्रत्यक्ष बसला आहे असा भास होतो हे नक्की.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

[email protected]