संसदेत कुठले मुद्दे मांडावेत हे सरकारने ठरवू नये, काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांची टीका

काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीका करताना स्पष्ट केले की संसदेचे कामकाज सुरळीत चालावे अशी आमचीही इच्छा आहे. मात्र, आम्ही कोणते मुद्दे मांडावे हे सरकारने ठरवायचे नाही.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माध्यमांशी बोलताना चिंदबरम म्हणाले की, “आम्हीच ठरवू कोणते मुद्दे उपस्थित करायचे. सरकारने फक्त त्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ आणि जागा द्यावी.” मतदार याद्यांबाबत (SIR) बोलताना त्यांनी सांगितले की मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ आणि अचूक हवी. “जो पात्र आहे त्याचं नाव वगळलं जाऊ नये आणि जो अपात्र आहे त्याचं नाव सामील होऊ नये. कोणताही नाव वगळण्याचा निर्णय योग्य नोटीस देऊनच झाला पाहिजे,” असं चिदंबरम यांनी सांगितलं.

चिदंबरम यांनी निवडणूक आयोगालाही धारेवर धरले. “निवडणूक आयोगाला प्रत्येक राज्यातील निवडणुकांचं वेळापत्रक माहित असतं. हे काम 12 ते 18 महिने आधी पूर्ण होऊ शकत होतं. इतक्या घाईत का केलं जातंय? BLO वर एवढा दबाव का टाकला जातोय की त्यात मृत्यूसारख्या घटना घडतात?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच संसदेचे कामकाज सुरळीत चालावे अशी आमचीही इच्छा आहे. सरकारने आम्हाला आमचे निवडलेले मुद्दे मांडण्यासाठी वेळ द्यावा. पण आम्ही कुठले मुद्दे मांडावे हे सरकारने ठरवू नये असेही चिंदबरम म्हणाले.