कश्मीरात हुडहुडी! बारामुल्ला येथील धबधबा गोठला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱया कश्मीरमध्ये थंडीचा कहर झाला असून तापमान कमालीचे खाली आहे. अवघे नंदनवन गोठले आहे. दिवसा ऊन आणि रात्री हाडं गोठवणारी थंडी अनुभवायला मिळतेय. श्रीनगरमध्ये आज यंदाच्या मोसमातील सर्वात थंड रात्र होती. श्रीनगरमध्ये उणे 4.8 अंश तापमानाची नोंद झाली. बारामुल्ला जिह्यातील तंगमर्ग येथील गोठलेला धबधबा बघून पर्यटकही अवाक झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 23 डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम राहील. श्रीनगर शहराप्रमाणे गुलमर्ग येथे काल उणे 10.2 अंश तापमान होते. पहेलगामला उणे 7.4 तर काझीगुंड येथे उणे 3.3, कोकरनाथ उणे 5.2, कुपवाडा येथे उणे 4.8 अंश तापमानाची नोंद झाली. जम्मू कश्मीरमध्ये आलेले पर्यटक थंडीचा आनंद घेत आहेत.