
जम्मू- कश्मीरात स्थानिक जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी ) निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भाजप कार्यकर्ते आणि पत्रकारांना घेऊन जाणारी नाव रविवारी श्रीनगरच्या दल सरोवरात उलटल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पत्रकार आणि भाजप कार्यकर्त्यांना सुखरूप किनाऱयाला आणले. सुदैवाने या नाव दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
केंद्रशासित जम्मू-कश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकीतील सहाव्या टप्प्याचे मतदान रविवारी पार पडले. या निमित्ताने रविवारी भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आणि जम्मू-कश्मीर प्रभारी अरुण चुग, केंद्रीय मंत्री अनुराग ठापूर, राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन, अशोक कौल यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांनी दल सरोवरातील नेहरू पार्क पॉइंट ते चार चिनारी अशी शिकारा रॅली आयोजित केली होती. रॅलीत सर्व पदाधिकाऱयांनी नावेत बसून सरोवराचा फेरफटका मारला आणि किनाऱयावरील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
पत्रकार, कार्यकर्त्यांची नाव दुर्घटनाग्रस्त
भाजपच्या आजच्या शिकार यात्रेसाठी टीव्ही आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकारांसाठी वेगळ्या नावेची सोय करण्यात आली होती. या नावेत काही भाजप कार्यकर्तेही होते. नाव दल सरोवराच्या मध्यावर येताच पाण्यात कलंडली आणि एकच हाहाकार उडाला. पण किनाऱयावरील स्थानिक नागरिकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवत उलटलेल्या नावेवरील सर्व पत्रकार आणि कार्यकर्त्यांना सुखरूप किनाऱयावर आणल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.



























































