ब्रिटनच्या निवडणुकीत गाजतोय ‘कश्मीर’चा मुद्दा!

कोणत्याही निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येते. मात्र, ब्रिटनमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये कश्मीरचा मुद्दा सध्या गाजत आहे. हा मुद्दा निवडणुकीत उपस्थित करून हिंदुस्थानी मतदारांना आकर्षित करण्यासाठी लेबर आणि कंजरवेटिव्ह पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. कश्मीर मुद्द्यावर लेबर पक्षाच्या भूमिकेमुळे ब्रिटनमधील हिंदुस्थानी मतदार नाराज आहेत. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न कंजरवेटिव्ह पक्ष करत आहे.

लेबर पक्षाच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत कश्मीर मुद्द्यावर इमरजन्सी मोशन मंजूर करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षकांना कश्मीरमध्ये पाठवून परिस्थितीचा आढावा घेण्याची शिफारस त्यात होती. लेबर पक्षाने नागरिकांचे अपहरण, महिलांवरील अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघन हे मुद्दे उचलत हिंदुस्थानवर आक्षेप घेतला होता. कश्मीर नेत्यांना नजकैदेत ठेवणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचेही पक्षाने म्हटले होते.
पक्षाच्या या भूमिकेमुळे हिंदुस्थानी मतदार नाराज आहेत. केंद्र सरकारने 5 ऑगस्टला जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द केले होते. याचा परिणाम आता ब्रिटनच्या निवडणुकीतही दिसत आहे. लेबर पक्षाच्या या भूमिकेमुळे हिंदुस्थानी मतदार नाराज झाल्याचे लक्षात आल्यावर पक्षाला खुलासा करावा लागला होता. कश्मीर मुद्दा हा हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे पक्षाने स्पष्ट केले होते.

लेबर पक्षाच्या या भूमिकेमुळे ब्रिटनमधील हिंदुस्थानी नागरिक आणि भाजप समर्थक लेबर पक्षाविरोधात उभे ठाकले आहेत. लेबर पक्षाला मतदान करू नये, असे आवाहन त्यांनी हिंदुस्थानी मतदारांना केले आहे. आम्ही कंजरवेटिव्ह पक्षाचा प्रचार करत असून ब्रिटनमधील 48 ठिकाणी हिंदुस्थानी मतदार मोठ्या प्रमाणात असलेल्या ठिकाणी लेबर पक्षाला मतदान करू नये, असे आवाहन करण्यात येत असल्याचे कुलदीपसिंग शेखावत यांनी सांगितले. लेबर पक्षाच्या भूमिकेमुळे हिंदुस्थानी मतदार नाराज आहेत. हिंदुस्थानी मतदारांच्या नाराजीमुळे लेबर पक्ष अडचणीत सापडला आहे. ब्रिटनमधील अल्पसंख्याक समुदायावर लेबर पक्षाची चांगली पकड आहे. गेली अनेक वर्षे लेबर पक्षाला हिंदुस्थानी मतदारांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, कश्मीर मुद्द्यावर लेबर पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे आता अनेक हिंदुस्थानी मतदार कंजरवेटिव्ह पक्षाकडे वळले आहेत. ब्रिटनमध्ये 2010 मध्ये झालेल्या निवडणुकीत 30 टक्के हिंदुस्थानी मतदारांनी कंजरवेटिव्ह पक्षाला मतदान केले होते. तर 2017 मध्ये हा आकडा 40 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

हिंदुस्थानी मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी लेबर पक्षाने काही पावले उचलली आहेत. पक्षाचे अध्यक्ष इयान लावेरी यांनी पत्र लिहून कश्मीर मुद्द्यावर आणलेल्या इमजन्सी मोशनमधील काही मुद्द्यांमध्ये बदल केल्याचे म्हटले आहे. तसेच कश्मीरमधील संवेदशीलतेबाबत पक्षाला माहिती असून हिंदुस्थानींच्या भावनेचा सन्मान करत असल्याचे पत्रात म्हटले आहे. इमेरजन्सी मोशनमधील काही मुद्द्यांमुळे हिंदुस्थानी मतदार नाराज आहेत. मात्र, मतभेद असले तरी मतदारांनी याविरोधात एममेकांविरोधात उभे ठाकू नये, असे आवाहनही त्यात केले आहे. या पत्रातून हिंदुस्थानी मतदारांची नाराजी दूर करण्याचा लेबर पक्षाचा प्रयत्न आहे. तर कंजरवेटिव्ह पक्ष या नाराजीचा फायदा घेत आहे. त्यामुळे ब्रिटनमधील निवडणुकीत कश्मीर मुद्दा गाजणार असून हिंदुस्थानी मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या