
सामना ऑनलाईन, श्रीनगर
जम्मू-कश्मीरात पुलवामा येथे ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मुदस्सीर अहमद खान याच्यासह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यासाठी मुदस्सीरनेच स्फोटकांचा साठा पुरविला होता. दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर 14 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 18 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यापुढेही दहशतवाद्यांविरुद्धचे ऑपरेशन सुरूच राहणार असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.
14 फेब्रुवारीला पुलवामा येथे आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेताना हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर सुरक्षा दलांनी कश्मीर खोऱ्यात मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल के.जे.एस. धिल्लन, जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक स्वयंप्रकाश पाणी आणि सीआरपीएफचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सुरक्षा दलाच्या मोहिमेबाबत माहिती दिली. पुलवामा हल्ल्याचा कटाचा सूत्रधार मुदस्सीर अहमद हा होता. मुदस्सीर आणि त्याचे दहशतवादी साथीदार त्रालमधील पिंगलिश गावात लपल्याची खबर मिळताच सुरक्षा दलाने आज शोधमोहीम राबविली. चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यात मुदस्सीरचा समावेश आहे. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर असलेला मुदस्सीर अहमद खान ऊर्फ मोहम्मद भाई हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार होता अशी माहिती लष्कराचे लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लन यांनी सांगितले. मुदस्सीरच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाची ओळख पटवलेली आहे. मृतदेहांची डीएनए चाचणी केली जाईल. यावेळी ‘जैश’चा साजीद भट यालाही कंठस्नान घातले आहे.
स्फोटके आणि वाहन पुरविले होते
2018 मध्ये ‘जैश’मध्ये सामील झालेला 23 वर्षीय मुदस्सिर इलेक्ट्रीशन होता. आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दारच्या तो संपर्कात होता. पुलवामा हल्ल्यासाठी मुदस्सिरने आदिल दार ला स्फोटके पुरविली आणि वाहनाची व्यवस्था केली.
सर्व दहशतवाद्यांचा खात्मा होईपर्यंत ‘ऑपरेशन’ सुरूच राहणार
जैश, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आमच्या रडारवर आहेत. काश्मीर खोऱ्यातही सर्व दहशतवाद्यांचा खात्मा होईपर्यंत सुरक्षा दलाचे ऑपरेशन सुरूच राहणार, असा इशारा लेफ्टनंट जनरल धिल्लन यांनी दिला. दहशतवाद्यांच्या सर्व ‘मोडेस’ची माहिती सुरक्षा दलाला आहे. त्यादृष्टीने आम्ही ऑपरेशन राबवत आहोत, असे ते म्हणाले.
आमचे ऑपरेशन संपलेले नाही. दहशतवादी मुदस्सीर अहमद खान हा पुलवामा हल्ल्यातील कटाचा मुख्य सूत्रधार होता. पण त्याच्या मागे कोण लोक आहेत, त्याला कोणी स्फोटके पुरविली याचा तपास एनआयएच्या मदतीने सुरू असल्याचे धिल्लन यांनी सांगितले.




























































