हरियाणाच्या 14 वर्षीय मुलाने रचला इतिहास, ‘केबीसी’मध्ये 1 कोटी जिंकणारा सर्वात लहान स्पर्धक ठरला

हरियाणाच्या 14 वर्षीय मयंकने इतिहास रचला आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट असणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये (Kaun Banega Crorepati) 1 कोटी रुपये जिंकणारा तो सर्वात लहान स्पर्धक ठरला आहे. मयंक आठवीमध्ये शिकत असून त्याने केबीसीच्या 15व्या हंगामामध्ये करोडपती होण्याचा बहुमान मिळवला.

मयंक हा हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील पाली गावचा रहिवासी आहे. तो आठवीमध्ये शिकत असून ज्ञान आणि वयाचा काहीच संबंध नसतो हे त्याने सिद्ध केले आहे. ज्यूनीयर केबीसीमध्ये त्याने 1 कोटी रुपये जिंकले असून सोमवारी या भागाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.

दरम्यान, एक कोटी जिंकल्यानंतर मयंकच्या कुटुंबियांनी संपूर्ण गावाला जेवण दिले. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे. खट्टर यांनी ट्विट करत मयंकचे अभिनंदन केले.

मयंकने सुरुवातीपासूनच दमदार खेळ केला. एकही लाईफलाईन न वापरता त्याने 3.20 लाख रुपये जिंकले. त्यानंतर 12.50 लाखांच्या प्रश्नासाठी त्याने पहिली लाईफलाईन वापरली. यानंतर पुढे सरकत त्याने एक कोटी रुपये जिंकले. त्याच्याकडे 7 कोटी रुपये जिंकण्याचीही संधी होती. मात्र प्रश्न ऐकल्यानंतर त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि 1 कोटींवर समाधान मानले.