केजरीवाल, सिसोदिया मुंबई पालिका निवडणूक प्रचारात उतरणार, आपची स्टार प्रचारकाची यादी जाहीर

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाने मुंबई पालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी नेते प्रचारासाठी मुंबईच्या मैदानात उतरणार आहेत.

मुंबई पालिकेच्या सर्व 227 जागांवर आम आदमी पक्ष निवडणूक लढविणार आहे. पक्षाची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर 40 स्टार प्रचारकांची यादी आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, पंजाब, गोवा आणि गुजरातमधील नेत्यांचा समावेश आहे.

आप नेते केजरीवाल, सिसोदिया, भगवंत मान यांच्यासह राज्यसभा सदस्य संजय सिंह, माजी मंत्री सत्येंद्र जैन, अतिशी, पंकजकुमार गुप्ता, इमरान हुसैन, अमनतुल्ला खान, सौरभ भारद्धाज आदी प्रमुख नेते मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत.