
सामना ऑनलाईन, थिरुवनंतपुरम
यंदा देशभरातील सात राज्यांत पावसाचा कहर आणि महापुराने 868 नागरिकांचा बळी घेतला आहे. त्यात एकटय़ा केरळचे 247 नागरिक आहेत. केरळच्या 14 जिल्ह्यांना महापुराचा जबर फटका बसला असून 2.11 लाख लोक बेघर झाले आहेत. पावसाने केरळातील 32 हजार 500 हेक्टरवरील शेती पार उद्ध्वस्त झाली आहे. यंदा पाऊस आणि पुराने उत्तर प्रदेशमध्ये 191, पश्चिम बंगालमध्ये 183, महाराष्ट्रात 139, गुजरातमध्ये 52, आसाममध्ये 45 आणि नागालॅण्डमध्ये 11 नागरिकांचा बळी घेतल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे.
केरळ राज्यावरील अस्मानी संकटाने नऊ दिवसांत 324 लोकांचा बळी घेतला असून केरळच्या पर्यटन आणि कृषी क्षेत्राची प्रचंड हानी केली आहे. आभाळ फाटल्याप्रमाणे कोसळणाऱ्या पावसाने घरे वाहून गेली असून रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एरवी तारक वाटणारी पेरियार नदी वैरीण बनून केरळवासीयांच्या जीवावर उठली आहे. गुरुवारी एका दिवसातच महापुराने 103 नागरिकांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत 324 जणांचे बळी गेले असून 2 लाख 23 हजार लोक बेघर झाले आहेत. राज्यातील 14 पैकी 13 जिह्यांत रेड ऍलर्ट घोषित करण्यात आला आहे. बचाव पथकांनी 1.65 लाख नागरिकांना 1,155 बचाव शिबिरांत पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री केरळात दाखल होणार असून उद्या ते या महाप्रलयाची पाहणी करतील असे सांगण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर केंद्राने केरळला 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पण आभाळ फाटले त्याला कुठे कुठे ठिगळ लावायचे अशी दुर्दशा झालेल्या केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केंद्राकडे 8,316 कोटी रुपयांचे मदत पॅकेज मागितले आहे.
महाबचावकार्य वेगाने सुरू
केंद्र सरकारने केरळवरील अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल, हवाई दल, कोस्टगार्डस् आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण बलाच्या अनेक तुकडय़ांसह 410 मोटारबोटी, 7800 लाइफ जॅकेटस्, 40 लाइट टॉवर्स, दोन हजार फूड पॅकेटस्, दोन लाख 40 हजार पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स आणि मोठय़ा प्रमाणात मिल्क पावडरचा साठा अशी मदतसामग्री केरळला पाठवली आहे.


























































