
हिंदुस्थानचे ‘मेट्रो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे 88 वर्षीय ज्येष्ठ अभियंते ई.श्रीधरन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती केरळ भाजप प्रमुख के. सुरेंद्रन यांनी गुरुवारी दिली. श्रीधरन 21 फेब्रुवारीपासून केरळात आयोजित भाजपच्या विजय यात्रेदरम्यान अधिकृतपणे भाजपमध्ये सामील होणार आहेत. विजय यात्रा श्रीधरन यांच्या मल्लापुरम जिल्ह्यात पोचताच त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होऊ शकते असेही सुरेंद्रन म्हणाले. पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित श्रीधरन हे अतिशय प्रामाणिक आणि देशभक्त अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या प्रतिमेचा उपयोग भाजपला केरळमध्ये करून घ्यायचा आहे. म्हणूनच श्रीधरन यांनी भाजपकडून यंदाची केरळातील विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह भाजपने धरला आहे. या घडामोडींबाबत श्रीधरन यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.



























































