
क्रिकेटमध्ये वाढत्या वयाचा काैशल्यावर परिणाम होत नाही हे सिद्ध करीत इंग्लंडचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसन याने लिजंड क्रिकेट लीगमध्ये चौकार-षटकार पेश केला. पीटरसनने श्रीलंकेचा अष्टपैलू माजी क्रिकेटर सनथ जयसूर्याच्या षटकात सहाही चेंडूंवर सणसणीत चौकार आणि षटकार ठोकत नव्या पराक्रमाला गवसणी घातली. त्याने जयसूर्याच्या षटकात 30 धावांची लयलूट करीत माजी निवृत्त क्रिकेटपटूंसाठीची स्पर्धा गाजवली. पीटरसन आणि केविन ओब्रायन यांच्या धडाकेबाज खेळींमुळे वर्ल्ड जायंट्स संघाने 150 धावांचे मोठे आव्हान सहज पार केले आणि एशिया लायन्स संघावर शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.
26 जानेवारीला वर्ल्ड जायंट्स आणि आशिया लायन्स हे संघ आमने-सामने आले. वर्ल्ड जायंट्स संघाकडून खेळताना पीटरसनने केवळ 38 चेंडूंत 86 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीत 7 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. पीटरसनने 30 धावा तर जयसूर्याच्या एका षटकात फटकावल्या.



























































