रशियन जनरलवर गोळीबार करणारा मुख्य आरोपी दुबईत अटकेत; रशियाने केला युक्रेनवर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे अत्यंत विश्वासू आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेचे (GRU) वरिष्ठ अधिकारी लेफ्टिनेंट जनरल व्लादिमीर अलेक्सेयेव यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील मुख्य आरोपीला दुबईतून अटक करण्यात आली आहे. ल्युबोमिर कोरबा, असे या आरोपीचे नाव असून तो रशियन नागरिक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मॉस्कोमधील एका अपार्टमेंटबाहेर लेफ्टिनेंट जनरल अलेक्सेयेव यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात एकूण तीन जणांचा सहभाग होता, अशी माहिती रशियन तपास यंत्रणा ‘FSB’ ने दिली आहे.

मुख्य आरोपी ल्युबोमिर कोरबा याला दुबईत पकडून रशियाकडे सोपवण्यात आले आहे. दुसऱ्या एका आरोपीला मॉस्कोमधून अटक करण्यात आली आहे, तर तिसरा आरोपी युक्रेनला पळून गेल्याचा दावा रशियाने केला आहे.

दरम्यान, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी या हल्ल्याला युक्रेनचा दहशतवादी कट म्हटले आहे. रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेत अडथळा आणण्यासाठी हा हल्ला केल्याचा आरोप रशियाने केला आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (अबू धाबी) रशिया, युक्रेन आणि अमेरिका यांच्यात शांतता चर्चा सुरू होती, त्याच काळात हा हल्ला झाला.