‘ह्युंदाई’ नंतर नेटकऱ्यांचा ‘केएफसी’ ला दणका, ट्विट करत मागितली माफी; काय आहे प्रकरण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीर प्रश्नावर ट्विट करणे पाकिस्तान ह्युंदाईला महागात पडल्यानंतर ‘क्विक सर्व्हीस रेस्टरॉ (KFC) ने देखील असाच खोडसळपणा केला होता. ‘कश्मिरींना स्वातंत्र्य मिळावे’, असे केएफसीने कश्मीर दिनानिमित्त म्हटले होते. यामुळे ह्युंदाईप्रमाणे नेटकऱ्यांनी केएफसीलाही ट्रोल करत या त्यांचे दात घशात घातले. संतप्त नेटकऱ्यांनी #BoycottKFC हा हॅशटॅग सुरू केल्याने केएफसी इंडियाचे धाबे दणाणले. अखेर कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करत माफी मागितली आहे.

केएफसीच्या पाकिस्तान डिलरने कश्मीर दिनानिमित्त ट्वीट केले होते. ‘कश्मिरींना स्वातंत्र्य मिळावे’, अशी मागणी यात करण्यात आली होती. हे ट्वीट वाऱ्यासारखे व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी केएफसीवर निशाणा साधला. त्यानंतर कंपनीने माफी मागतली असून हिंदुस्थानीयांची सेवा करण्यास प्रतिबद्ध असल्याचे म्हटले आहे.

माफीनामा

केएफसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करून हिंदुस्थानी नागरिकांची माफी मागितली आहे. देशाबाहेर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करण्यात आलेल्या पोस्टप्रकरणी आम्ही खुल्या मनाने माफी मागतो. आम्ही हिंदुस्थानचा सन्मान करतो आणि हिंदुस्थानी नागरिकांची सेवा करण्यास प्रतिबद्ध आहोत, असे ट्वीट केएफसीने केले आहे. तसेच केएफसी प्रमाणे पिझ्झा हटने देखील अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्टशी आपण सहमन नसून त्याचे समर्थनही करत नसल्याचे म्हटले आहे.

ह्युंदाईवर संताप

@hyundaiPakistanOfficial या पाकिस्तानमधील ह्युंदाई डीलरच्या ट्विटर अकाऊंटने ‘कश्मीर एकता’ दिनाच्या समर्थनार्थ एक संदेश पोस्ट केला, यात त्याने “स्वातंत्र्यासाठी संघर्ष” असे म्हटले होते. यानंतर हिंदुस्थानात ट्विटरवर #BoycottHyundai ट्रेंडिंग सुरू झाले आणि अनेक लोकांनी या कंपनीची उत्पादने देशात खरेदी करणे बंद करण्याची मोहीम सुरू केली. कंपनीने देखील यावर स्पष्टीकरण दिले मात्र माफी मागितली नाही.