
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला आहे. पंजाबमध्ये अमृतपाल सिंगविरोधात कठोर कारवाई केल्याच्या निषेधार्थ खलिस्तान समर्थकांनी हा हल्ला केला आहे. अमृतपाल सिंगच्या अटकेसाठी पंजाब पोलीस छापेमारी करत आहेत. त्याच्या अनेक समर्थकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी 5 जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेतील वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्यामुळे हिंदुस्थानी अमेरिकन समुदायातील लोकांमध्ये संताप आहे. त्यामुळे अमेरिकेत आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमधील हल्ल्यानंतर हिंदुस्थानी अमेरिकन समुदायातील लोकांची संस्था असलेल्या फाउंडेशन फॉर इंडिया आणि इंडियन डायस्पोरा स्टडीजने यावर टीका केली आहे. संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, ‘लंडन आणि सॅन फ्रान्सिस्को येथील हिंदुस्थानी आस्थापनांवर होणारे हल्ले रोखण्यात यंत्रणेला अपयश आल्याने आम्ही दु:खी आहोत. दोन्ही ठिकाणी कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. सोमवारी झालेल्या या हल्ल्यात खलिस्तानी समर्थक घोषणा देत आत घुसले आणि वाणिज्य दूतावासाबाहेरील बॅरिकेडिंग तोडले.
या हल्लेखोरांनी येथे दोन खलिस्तानी झेंडेही लावले आहेत. मात्र, वाणिज्य दूतावासात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी हे झेंडे तातडीने हटवले. यानंतर आणखी काही लोक घुसले आणि त्यांनी वाणिज्य दूतावासाच्या दरवाजा आणि खिडक्यांवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यास सुरुवात केली. सध्या सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.