
एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने तरुणीला धावत्या लोकलखाली ढकलण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी खार रेल्वे स्थानकात घडली. पकडले जाऊ नये म्हणून आरोपीने त्यावेळी तेथून पळ काढला. मात्र वांद्रे रेल्वे पोलिसांनी शिताफीने तपास करून आरोपीला बारा तासांच्या आत बेडय़ा ठोकल्या.
सुमेध जाधव (24) असे त्या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. सुमेधचे पीडित तरुणीशी मैत्रीचे संबंध होते. दोन वर्षांपूर्वी दोघे एका ठिकाणी कामाला होते. तेव्हापासून सुमेध तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला. मात्र सुमेध दारू पित असल्याने तरुणी त्याला टाळत होती. तरीसुद्धा सुमेधने तिचा पिच्छा पुरवला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीच्या पालकांनी निर्मलनगर पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी समज दिल्यानंतर तो काही दिवस शांत बसला, पण त्यानंतर परत त्याने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. शुक्रवारी तरुणी खार स्थानकात येताच सुमेधने लोकलखाली उडी टाकण्याची ऍक्टिंग करत तरुणीलाच धावत्या लोकलखाली फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ती बचावली. तिच्या डोक्यावर बारा टाके पडले. त्यावेळी तरुणीला लोकलखाली ढकलून सुमेधने पळ काढला.
याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खलिद व उपायुक्त प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला.
आईसमोरच मुलीला मारण्याचा प्रयत्न
पोलिसांनी तरुणीला अंधेरी स्थानकात नेऊन लोकलमध्ये बसविले. त्यानंतर तरुणीने आईला फोन करून खार स्थानकात नेण्यासाठी बोलावले. त्यानुसार तिची आई खार स्थानकात आली, पण सुमेधने तरुणीला तिच्या आईसमोरच ओढून नेत लोकलखाली फेकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुलीच्या आईने आरडाओरड केल्याने त्याने तेथून पळ काढला

























































