
कोरोनाच्या संकटामुळे ट्रेनमध्ये अंध व्यक्ती गाणी म्हणून आपल्या आपल्या कुटुंबांचे पोट भरायचे. आता लोकलच बंद असल्याने अंध ,अपंग यांची उपासमार होत आहे. अशा लोकांसाठी शिवसेनेने पुढाकार घेत त्यांना अन्नधान्य आणि अन्य गरजेच्या वस्तू देऊन त्यांची भूक भागविली आहे. या लोकोपयोगी कार्यामुळे गोरगरिबांनी शिवसेनेला धन्यवाद दिले आहेत.
मोहने, गाळेगाव परिसरातील हातावर पोट असणाऱ्या अंध, अपंग व्यक्तीच्या कुटुंबावर कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. रेल्वेमध्ये विविध वस्तू विकत, गाणे म्हणत गुजारण करणाऱ्या या अंध अपंगाच्या मदतीला शिवसेना धावली आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मोहने, गाळेगाव परिसरातील 50 अंध अपंग व्यक्तींना अन्नधान्याचे वाटप केले. 4 किलो तांदूळ, एक किलो तूरडाळ, एक किलो खाद्यतेल अशा प्रत्येकी अशा 50 अन्नधान्याचे कीट तातडीने मोहने येथील शिवसेना उपशहरप्रमुख विजय काटकर, रोहन कोट यांच्याकडे दिले. विजय काटकर, रोहन कोट, राम तरे ,बळीराम जाधव, दिनेश निकम यांनी अंध अपंग व्यक्तीशी संपर्क साधून त्यांना याचे वाटप केले.
























































