
खेड दापोली मार्गावरील नारिंगी पूल ते बहिरावली फाटा या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनचालकाना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आपघातही होऊ लागले असल्याने या रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरावे अन्यथा युवा सेना उग्र आंदोलन छेडेल असा इशारा सार्वजनीक बांधकाम उपविभाग खेड यांना देण्यात आला आहे.
खेड दापोली या मार्गावर नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खेड तालुक्यातील खाडीपट्टा तसेच मंडणगड तालुक्यात जायचे असेल तर याच मार्गावरून जावे लागते. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असल्याने नारिंगी पूल ते बहिरवली फाटा या दरम्यान वाहने हाकणे म्हणजे मृत्यूला आमंत्रन देण्यासारखे आहे. वाहनचालक तसेच पादचाऱ्यांसाठी जीवघेणे ठरणारे खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत याबाबत सार्वजनीक बांधकाम उपविभाग खेड यांच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले गेले.
गेले काही दिवस कोसळत असेलेला परतीचा पाऊस आता थांबला असल्याने बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करायला हवे होते मात्र बांधकाम विभाग खड्डे बुजविण्याबाबत काहीच हालचाल करत नसल्याने युवा सेनेचे जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी बांधकाम उपविभाग खेड कार्यालयाला धडक देवून रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ भरावेत अशी सूचना केली. येत्या दोन दिवसात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात आले नाहीत तर युवा सेना उग्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.


























































