
गेल्या आठ दिवसात खेड तालुक्यात 49 रुग्ण आढळून आल्याने खेड तालुक्याला पुन्हा कोरोनाचा विळखा पडतो कि काय अशी चर्चा सुरु झाली आहे. आठ दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होणे ही बाब गंभीर असल्याने कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनीच खबरदारी घ्यावी असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे. धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य यासाठी ठरवून दिलेल्या नियमनाचे उल्लंघन करू नये, मास्क, सॅनिटायझर तसेच सामाजिक अंतर या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अश्या सूचना खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी केल्या आहेत.
9 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथे एक रुग्ण आढळून आला होता. दुसऱ्या दिवशी या वाडीत तब्बल 27 रुग्ण आढळून आले. कोरोनाचा फैलाव होत असल्याचे लक्षात येताच आरोग्य विभागाने या गावात कोरोना चाचण्या करण्याचे काम हाती घेतले होते. या दरम्यान कोरोनाबाधितांचा आकडा 45 वर पोहचला आणि तालुक्याला कोरोनाचा विळखा तर पडत नाही ना अशी चर्चा सुरु झाली.
वरवली धुपेवाडी येथे आरोग्य यंत्रणा तळ ठोकून बसली असल्याने येथील कोरोना आटोक्यात येतो आहे असे वाटत आहे मात्र आता वावे या ठिकाणी आणखी चार रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. खेड तालुक्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने आज जिल्ह्याधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारे तालुका प्रशासकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून कोरोनाला आळा घालण्यासंदर्भात काही महत्वाच्या सूचना केल्या.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शेळके या बाबत माहिती देताना म्हणाले कि गेल्या आठ दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत हे बाब गंभीर असल्याने नागरिकांनी शासनाने कोरोनाबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणा कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे मात्र नागरिकांची साथ असणे गरजेचे आहे. कोरोनाला आळा घालायचा असेल तर नागरिकांनी नियमित मास्क वापरणे, हात वारंवार सॅनिटाईज करणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर सामाजिक अंतर ठेवण्याबरोबरच धार्मिक किंवा लग्नकार्यात गर्दी होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. गावातील नागरिकांना सूचना देण्याबाबत ग्रामपंचायतीला कळविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन डॉ शेळके यांनी केले आहे.
































































