कोहलीला ‘0’ गुण असूनही खेलरत्न, ’80’ गुण मिळवणाऱ्याला वाटाण्याच्या अक्षता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कॉमनवेल्थ आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई करणाऱ्या कुस्तीपटू बजरंग पुनिया याला खेलरत्न पुरस्काराच्या यादीत आपलं नाव नसल्याचं पाहून जबरदस्त धक्का बसला आहे. गुणपद्धतीच्या आधारे हे पुरस्कार देण्यात येत असून ८० गुण मिळनही मला हा पुरस्कार का मिळाला नाही असा प्रश्न बजरंगने विचारलाय. यासाठी आता त्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. बजरंग पुनियाप्रमाणेच तिरंदाज प्रशिक्षक जीवनज्योतसिंह तेजा यांनीही बजरंग याच्याप्रमाणे कोर्टात जाण्याचं ठरवलं आहे.

क्रिकेटपटू विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची खेलरत्न पुरस्कारांसाठी क्रीडामंत्रालयाकडे शिफारस करण्यात आली होती, जी मंत्रालयाने मान्य केली आहे. त्यांना पुरस्कार मिळतोय याबाबत माझा आक्षेप नाही असं बजरंग पुनिया याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. या पुरस्कारांसाठी गुणतालिकेच्या आधारे खेळाडूंची निवड केली जाते असं बजरंगने म्हटलं आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवल्यास खेळाडूला सर्वाधिक गुण मिळतात.बजरंगने ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं. २०१८ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने सुवर्ण पदक पटकावलं होतं. आत्तापर्यंत केलेल्या कामगिरीच्या आधारावर बजरंगला ८० गुण मिळाले आहेत, तरीही आपल्याला हा पुरस्कार का मिळाला नाही असा प्रश्न बजरंगला सतावतोय.