खो–खो वर्ल्ड कपचा बिगुल वाजला, 2020 मध्ये पहिली स्पर्धा होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जयेंद्र लोंढे|  मुंबई

मल्लखांब या महाराष्ट्राच्या मातीतल्या खेळाचा पहिला वर्ल्ड कप शिवाजी पार्क येथे रंगल्यानंतर आता खो-खो या पारंपरिक खेळाच्या पहिल्यावहिल्या जागतिक स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. पुढल्या वर्षी अर्थातच 2020 सालामध्ये खो-खो या खेळाचा पहिला वर्ल्ड कप होण्याचे संकेत मिळाले आहेत. हिंदुस्थान, इंग्लंड आणि कुवेत या तीन देशांपैकी एका ठिकाणी ही स्पर्धा होणार असल्याची माहिती खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी एम एस त्यागी यांनी दैनिक ‘सामना’ला दिली. याप्रसंगी खो-खो प्रीमियर लीग या वर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

40 ते 45 देशांचा सहभाग असणार

खो-खोचा पहिला वर्ल्ड कप बहुतांशी इंग्लंडमध्ये आयोजित करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. तसेच यामध्ये 40 ते 45 देशांचा सहभाग असावा यासाठी आतापासूनच प्रयत्न करण्यात येत आहेत, असे एम. एस. त्यागी यांनी यावेळी स्पष्ट केले. आशियातील 12 देशांसह इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स व पेरू या देशांचा सहभाग निश्चित आहे.  

इंग्लंडमध्ये राष्ट्रीय स्पर्धा रंगली

खो-खो या खेळाचा प्रचार व प्रसार सुरू झाला असून इंग्लंड व वेल्समध्ये या खेळाला दणदणीत प्रतिसादही लाभत आहे. तेथे या खेळाची राष्ट्रीय स्पर्धाही रंगली. यामध्ये हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूंसह तेथील स्थानिक खेळाडूही सहभागी झाले हे विशेष. त्यामुळे हा खेळ भविष्यात नक्कीच झेप घेईल, असे त्यागी यांना वाटते.  

मुंबई, पुण्यात होणार लीगच्या लढती

क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती, कबड्डी या खेळांच्या लीगनंतर आता खो-खो या खेळाची लीगही सुरू होणार आहे. या वर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर या कालावधीत ही खेळवण्यात येणार आहे. यामध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. लीगमधील प्रत्येक संघात 10 टक्के परदेशी खेळाडू असणे अनिवार्य असणार आहे. तसेच प्रत्येक संघात 20 खेळाडू असणार आहेत. मुंबई, पुणे, इंदोर व दिल्ली या चार ठिकाणी लढती होतील, असे एम. एस. त्यागी यांनी सांगितले.

एशियाड, राष्ट्रकुलनंतर ऑलिम्पिक

खो-खो या खेळाला ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचे स्वप्न सर्वांनीच बघितले आहे. आशियाई इनडोअर गेम्समध्ये प्रदर्शनीय खेळ म्हणून खो-खोला स्थान देण्यात आले असून त्यानंतरच्या स्पर्धेत खो-खोचा समावेश करण्यात येईल. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही या खेळाच्या समावेशाबाबत आयोजकांशी बोलणी झाली आहे, असे एम. एस. त्यागी यांनी पुढे नमूद केले.