खोपोलीत ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त, 107 कोटींचे एमडी जप्त

खोपोलीतील ढेकू गावच्या हद्दीत पोलिसांनी एका कंपनीवर छापा टाकून तब्बल 107 कोटींचे 85 किलो एमडी जप्त केले आहे.  इंडिया इलेक्ट्रिक पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असा फलक कारखान्यावर लावण्यात आला होता. पण आतमध्ये मात्र ड्रग्जची फॅक्टरी सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. याप्रकरणी तिघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची नावे मात्र उघड केलेली नाहीत. त्यामुळे या ड्रग्ज फॅक्टरीचे गूढ वाढले आहे. त्याचे धागेदोरे आणखी कुठे आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत.

खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढेकू या गावात इंडिया इलेक्ट्रिक पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. बोर्ड या नावाचा असला तरी आतमध्ये अचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा कारखाना सुरू होता. या कारखान्यात काही अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे बनवले जात असल्याची खबर पोलिसांना लागली. त्यानंतर रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम कदम, शीतल राऊत, हरेश काळसेकर, प्रवीण स्वामी, सुधाकर लहाने या अधिकाऱ्यांच्या टीमने कारखान्यावर छापा टाकला.

कारखान्याला सील ठोकले

मोठय़ा फौजफाटय़ासह पोलिसांनी कंपनीवर धाड टाकताच आतमध्ये ड्रग्जचे मोठे घबाडच असल्याचे आढळून आले. पोलिसांनी संपूर्ण कारखान्याची झडती घेऊन तब्बल 107 कोटींचे लपवलेले एमडी जप्त केले. 85 किलो 200 ग्रॅम एवढे त्याचे  वजन असून ड्रगसाठी लागणारे अन्य केमिकलदेखील ताब्यात घेतले आहे. दरम्यान या कंपनीला सील ठोकण्यात आले असून पोलीस ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी करीत आहेत. या ड्रगचे धागेदोरे आणखी खोलवर असल्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.