
तीव्र उन्हाळा लक्षात घेऊन टाटा पॉवर कंपनीने पाणीपुरवठा मर्यादित केल्याने खोपोलीकरांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. दिवसातून फक्त दोन तास पुरवठा केला जाणार असल्याचा फतवा नगर परिषदेने काढला असून तब्बल एक महिना पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागणार आहे. दरम्यान या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी खोपोलीकरांनी केली आहे.
खोपोली शहराची लोकसंख्या आता एक ते दीड लाखावर जाऊन पोहोचली आहे. त्यामानाने पाणी अतिशय कमी पडते. खोपोलीत टाटा पॉवर कंपनीचा स्वतःचा वीज निर्मितीचा प्रकल्प असून त्यातील पाणी नागरिकांना पिण्यासाठी पाताळगंगा नदीच्या माध्यमातून सोडले जाते. या पाण्यावर खोपोलीसह खालापूर व रसायनी औद्योगिक वसाहतीही अवलंबून आहेत. तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजना तसेच शेतीसाठीदेखील हेच पाणी वापरले जाते. भीषण उन्हाळा लक्षात घेता टाटा पॉवर कंपनीने पाणीपुरवठा कमी प्रमाणात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजपासून अंमलबजावणी
- दीड ते दोन तास पाणीपुरवठा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी उद्या ११ मे ते १५ जूनपर्यंत करण्यात येणार आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्ष कुलदीप शेंडे व मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केले
- लोकसंख्या वाढत असताना देखील नगर परिषदेकडे स्वतःचे धरण नाही. त्यामुळे टाटा पॉवर कंपनीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.
- टाटा पॉवर कंपनीने गेल्या पंधरा दिवसांपासून पाताळगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यामध्ये अनियमितता केल्याने खोपोलीकरांना आता किमान महिनाभर तरी पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे
























































