निर्माल्यात गेलेली 2 लाखांची चेन बाप्पाच्या कृपेने परत मिळाली, सफाई कामगार ठरले विघ्नहर्ता

निर्माल्यात गेलेली २ लाखांची चेन बाप्पाच्या कृपेने परत मिळाली आहे. खोपोलीच्या शास्त्रीनगर येथील कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या भाविकांनी मूर्तीवरील फुलांचा हार काढून मूर्ती विसर्जन केली. जमा झालेले निर्माल्य गणेशभक्तांनी निर्माल्य कलशात टाकले. मात्र फुलांच्या हारासोबत सोनसाखळीदेखील कलशात गेली. याची माहिती मिळताच खोपोली नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने २ लाखांची चेन शोधून भाविकांना प्रामाणिकपणे परत केली. त्यामुळे मोठे विघ्न टळले.

खोपोली शहरात सात दिवसांच्या गणपती बाप्पांचे मोठ्या जल्लोषात विसर्जन झाले. शास्त्रीनगर येथे राहणारे इतराज कुटुंबीय नेहरू गार्डनमधील कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करायला गेले होते. मूर्ती विसर्जनासाठी देताना गणेशभक्तांनी मूर्तीवरील हार, फुले काढली. ती एका पिशवीत भरली आणि ती पिशवी निर्माल्य कलशात टाकली. घरी गेल्यानंतर लक्षात आले की गणपतीच्या गळ्यातील २० ग्रॅमची सोनसाखळी निर्माल्यासह गेली. त्यांनी तातडीने विसर्जनस्थळी धाव घेतली.

प्रामाणिकपणाचा सत्कार

खोपोली नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे मुकादम मंगेश चंदर वाणी यांना सर्व प्रकारची माहिती दिली. सफाई कर्मचारी सुनील गायकवाड यांनी निर्माल्य कलशातील सर्व पिशव्यांची बारकाईने तपासणी करून सोनसाखळी शोधून काढली आणि इतराज कुटुंबाच्या स्वाधिन केली. या कार्याबद्दल गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, उपमुख्याधिकारी रणजित पवार यांनी नगरपालिकेच्या सभागृहात सुनील गायकवाड यांचा सत्कार केला.