सामना ऑनलाईन । नानजिंग
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील बुधवारचा दिवस हिंदुस्थानसाठी संमिश्र यशाचा ठरला. सकाळच्या सत्रात हिंदुस्थानच्या एकापाठोपाठ एक खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले. भरवशाच्या एच. एस. प्रणॉयला पराभवाचा धक्का बसला तर दुहेरीमध्येही हिंदुस्थानी खेळाडूंनी निराशा केली. मात्र त्यानंतर किदम्बी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणीत यांच्या विजयामुळे हिंदुस्थानी चाहत्यांना दिलासा मिळाला.
पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्या फित्रीयानीचे आव्हा २१-१४, २१-९ असे सहज परतवून लावले. पुरुष एकेरीत बी. साईप्रणीतने ३३ मिनिटांत स्पेनच्या लुईक एन्रिक पेनालव्हेरचा २१-१८, २१-११ असा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
दुहेरीत निराशा
पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकिरेड्डी व चिराग शेट्टी या हिंदुस्थानी जोडीला १ तास ०८ मिनिटांच्या संघर्षानंतर हार पत्करावी लागली. डेन्मार्कच्या किम अॅस्ट्रप व आंद्रेस रॅस्मुसेन गोडीने चुरशीच्या लढतीत २१-१८, १५-२१, २१-१६ अशा फरकाने हिंदुस्थानी जोडीचा पराभव केला. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांचेही आव्हान संपुष्टात आले.
























































