सांगलीतून अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची 13 तासांत सुटका

सांगलीनजीक हरिपूर रस्त्यावरील पाटणे प्लॉट परिसरातून एका व्यावसायिकाचे तीन लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अवघ्या 13 तासांत कौशल्याने तपास करून दोन खंडणीखोरांच्या मुसक्या आवळत व्यावसायिकाची सुटका केली. शनिवारी पहाटे 2.30 च्या सुमारास विश्रामबाग परिसरात थरारक पाठलाग करून पोलिसांनी खंडणीखोरांना अटक केली.

नीलेश बाळासाहेब गालिंदे (वय 30, रा. आनंद चित्रपटगृहासमोर, गावभाग) आणि मनोज मोहनसिंग दुबे (वय 32, रा. 6 वी गल्ली, वारणाली) अशी अटक करण्यात आलेल्या खंडणीखोरांची
नावे आहेत.

पोलिसांनी खंडणीखोरांकडून गुह्यात वापरलेली सात लाखांची चारचाकी जप्त करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, सचिन शिंदे, संदिप पाटील, मच्छिंद्र बर्डे, रफिक मुलाणी, विनायक शिंदे, गणेश कांबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदिप कुंभार, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, कॅप्टन गुंडवाडे यांनी सहभाग घेतला.

फिर्यादी सूरज बाळासाहेब पाटील (वय 30, रा. हरिपूर रस्ता, पाटणे प्लॉट, सांगली) यांचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची आणि संशयित दोघांची दुकानामुळे ओळख होती. संशयितांनी फिर्यादी सूरज पाटील यांचे शनिवारी (दि. 30) दुपारी अपहरण केले होते. मिरज तालुक्यातील भोसे येथील तलावाकडे नेऊन संशयितांनी फिर्यादी सूरज यास जबर मारहाण केली. तसेच संशयितांनी सूरज यांना, ‘तुला जिवंत सोडणार नाही, तुझे तुकडे करतो’, अशी धमकी दिली. यानंतर संशयित मनोज दुबे याने मोबाईलवरून आंबी यांना चित्रण दाखवले आणि तीन लाख रुपये दिले तर तो जिवंत घरी येईल, अशी धमकी दिली.

याबाबत घाबरलेल्या विनायक आंबी यांनी तातडीने सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे प्रकटीकरण शाखेस याचा तपास करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, तांत्रिक तपासाच्या आधारे सुरू असलेल्या पोलीस तपासात संशयित सतत जागा बदलत असल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी दुपारपासून संशयित व्यावसायिकास घेऊन भोसे, अंकली, हातकणंगले, दानोळी, मिरज येथे अशा ठिकाणी नेले होते. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास संशयित व्यावसायिक सूरज यास घेऊन विश्रामबागकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वालचंद महाविद्यालयासमोर सापळा लावला होता. काही वेळातच भरधाव वेगाने येणाऱया चारचाकीमध्ये सूरज असल्याचे कळताच, पोलिसांनी चारचाकीचा पाठलाग केला. संशयितांनी वेगात चारचाकी चालवून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना खंडणीखोरांना जेरबंद करण्यात यश मिळाले. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.