तंबाखू न दिल्याच्या कारणावरून वृद्धाचा खून; कोल्हापुरातील घटना, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंबाखू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून वृद्धाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना कोल्हापूर शहरातील उद्यमनगर परिसरात आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांना अटक केली आहे. शंकर आकाराम कांबळे (वय 55, रा. माळापुडे, ता. शाहूवाडी) असे मृताचे नाव असून शुभम अशोक शेंडगे (वय 28) आणि रोहित अजय सूर्यगंध (वय 27, दोघे रा. यादवनगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

शंकर कांबळे हे दोन दिवसांपूर्वी कोटितीर्थ परिसरात राहणाऱया मुलीकडे आले होते. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फिरण्यासाठी ते घरातून बाहेर पडले होते. उद्यमनगर परिसरातील वालावलकर रुग्णालयाजवळ रस्त्याने जाणाऱया दोन तरुणांनी त्यांच्याकडे तंबाखू मागितली. मात्र, कांबळे यांनी नकार दिल्याने या तरुणांनी जबरदस्तीने त्यांच्याकडून तंबाखूची पुडी काढून घेतली. ‘तंबाखू असतानाही देण्यास नकार का दिला? खोटे का बोललात?’ अशी विचारणा करीत या दोघांनी त्यांना काठीने मारहाण केली. त्यानंतर रस्त्यात पडलेला दगड त्यांच्या डोक्यात घातला. शंकर कांबळे यांचा मृत्यू झाल्याचे पाहून हल्लेखोर तेथून पळून गेले.

सकाळी सहाच्या सुमारास मृतदेह आढळल्याची माहिती महापालिकेच्या झाडू कामगाराकडून समजताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाची ओळख पटताच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून दोन्ही संशयितांना अवघ्या काही तासांतच गजाआड केले.