
उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जाँग उन गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थामुळे चर्चेत आला होता. जुलै महिन्यात त्याच्या डोक्याला पट्टी होती आणि काही खूणा दिसत होत्या. त्यामुळे त्याच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्क करण्यात येत होते. आता किम जाँग उनचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोमध्ये त्याचा लूक बदललेला दिसत आहे. या फोटोमध्ये तो खूप सडपातळ झाल्याचे दिसत आहे. वजन कमी करण्यासाठी किम उपचार घेत असल्याच्याही चर्चा होत्या. आता त्याचे वजन कमी झाले किंवा त्याने केले आहे, या चर्चेसह पुन्हा त्याच्या प्रकृतीबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
कोरोना महामारीच्या काळात उत्तर कोरिया आर्थिक संकटाशी सामना करत आहे. या कठीण काळात तरुण स्वयंसेकांना प्रोत्साहित करण्यासाठी एका कार्यक्रमात किम सहभागी झाला होता. त्यावेळचे हे फोटो असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे. कोरोना काळात या स्वंयसोवकांनी केलेल्या कार्याचा किमने गौरव केला.
या फोटोमुळे किमच्या प्रकृतीबाबतच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचेही सांगण्यात येत आहे. प्रकृती स्वास्थ ढासळत असल्याने किम यांनी वजन कमी करण्यासाठी उपचार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांची प्रकृती उत्तम असून याबाबतच्या चर्चा म्हणजे फक्त अफवा असल्याचेही स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.




























































