स्मशानभूमीत मागितले अडीच हजार रुपये, नातेवाईकांनी रस्त्यावरच केले अंत्यविधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील सुरत शहरात स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये मागितल्याने मृताच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार रस्त्यावरच उरकून घेतले. प्रत्येक नातेवाईकाने स्वत:च्या परिने लाकडं गोळा केली व रस्त्यावरच मृतदेहाला अग्नी दिला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रकार धक्कादायक होता.

सुरत जिल्ह्यातील एना गावात राहणाऱ्या मोहन राठोड याचे मंगळवारी दिर्घ आजाराने निधन झाले. राठोड यांचे कुटुंब हे मजूरी करून पैसे कमवायचे. मात्र सध्या लॉकडाऊन मुळे कामधंदा बंद आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सध्या पैशांची प्रचंज चणचण आहे. मंगळवारी राठोड यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेला. मात्र तेथील प्रशासनाने राठोड यांच्या नातेवाईकांकडे अडीच हजार रुपये मागितले.

त्या आतापर्यंत स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी 1200 रुपये घेतले जायचे. मात्र आता याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी तब्बल दुप्पटाहून अधिक 2500 रुपये मागितले जात आहेत. मात्र मृताच्या नातेवाईकांकडे तेवढे पैसे नसल्याने त्यांनी रस्त्यावरच अंत्यासंस्कार केले.