
सामना प्रतिनिधी, मुंबई
उंदीर पकडण्यासाठी लावण्यात येणाऱया ग्लू पॅडला चिकटून तडफडणाऱ्या एका रंगीबेरंगी किंगफिशर पक्ष्याची पशुप्रेमींनी सुटका केली. दहिसर येथे एका सोसायटीच्या बगिचामध्ये हा पक्षी अडकून पडल्याचे दिसल्यानंतर नागरिकांनी ‘पॉज’ या पशूप्रेमी संस्थेला संपर्क साधला होता. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या किंगफिशरची मुक्तता केली.
ग्लू पॅडवरील चिकट पदार्थ हा लांबून चकचकीत आणि आकर्षक दिसतो. ते पाणी असावे किंवा खाद्यपदार्थ असावा असे वाटल्याने या किंगफिशरने त्यावर चोच मारली. त्यामुळे त्याची चोच त्यात चिकटून बसली आणि पंख फडफडवत सुटका करण्याच्या प्रयत्नात त्याचे पंखही चिकटले. पशूतज्ञ डॉ. मनीष पिंगळे यांनी या किंगफिशरच्या पंखांना व चोचीला चिकटलेला ग्लू काढण्यासाठी दोन तास प्रयत्न केले. त्यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या किंगफिशरची माहिती देण्यात आली.


























































