किन्हवलीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले वनसंवर्धनाचे धडे, राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वनविभाग, शहापूर व वनपरिक्षेत्र डोळखांब यांच्या वतीने गुंडे येथील चैतन्य विद्यालयात निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वनसंवर्धनाचे धडे गिरवले. वन, वन्यजीव आणि पर्यावरणाचे जतन केले तरच आपले भविष्य सुरक्षित राहील. याबाबत वनाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती केली.

शहापूर वनविभागाच्या डोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीतील गुंडे येथील चैतन्य विद्यालयात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. वन्यजीव आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने या सप्ताहाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाप्रती जबाबदारी याविषयी जनजागृती करण्यात आली.

रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा

डोळखांब वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश पाटील व मुख्याध्यापक वसंत सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव चित्रकला व रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रके व सन्मानचिन्हे देऊन गौरवण्यात आले. यावेळी वन कर्मचारी व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत चौधरी यांनी केले.