वेळेचं व्यवस्थापन आवश्यक

>> किरण खोत (निवेदक, सूत्रसंचालक)

आज या ठिकाणी मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावेत… अशी विनंती करत कधी कधी वत्ते सुरू होतात ते थांबतच नाहीत. याउलट काही व्यक्तींना बोलण्यासाठी दिलेल्या वेळेचा पुरेपूर वापरच करता येत नाही. या दोन्ही अवस्थेत काय करता येईल याविषयी आज थोडं जाणून घेऊ या.

या दोन्ही परिस्थितीत तुमचं वाचन अतिशय महत्त्वाचं. जो वाचनात कमकुवत, तो बोलण्यात कमकुवत. वाचन हेच वत्तृत्वाचे सार आहे. जर तुमच्या बोलण्यात बदल आणायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पुस्तकं, इंटरनेटवरील संदर्भासहित असणारी माहिती, वर्तमानपत्र यांचं सतत वाचन करत रहावं लागेल. जर तुम्हाला वाचनाची आवड नसेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही ऑडिओ बुकच्या माध्यमातून श्रवणानेसुद्धा ज्ञानाचा साठा वाढवू शकता.

वाचताना किंवा श्रवण करत असताना जर नवीन माहिती मिळाली तर त्याची नोंद एका नोंदवहीत ठेवा किंवा स्वतःला ते मुद्दे ई-मेल करा आणि योग्य ठिकाणी ते मुद्दे बोलण्यात वापरा.
आपण कोणत्या पद्धतीच्या कार्यक्रमात बोलतोय याचं भान ठेवणं अतिशय गरजेचे आहे. शोकसभा, पारितोषिक वितरण समारंभ किंवा सत्कार समारंभ या ठिकाणी जितकं थोडक्यात बोलता येईल तितकं कमी बोलावं.
भाषणासाठी लागणारी माहिती इंटरनेटवर तुम्हाला मिळू शकते, पण जेव्हा तुम्ही एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवर, पौराणिक पात्रांवर, ऐतिहासिक व्यक्तीवर भाष्य करता तेव्हा मात्र कुणी आव्हान केल्यास तुम्हाला त्या माहितीचा संदर्भ आणि स्रोत पटवून देता येणं आवश्यक आहे.

बोलण्यात हवी सहजता
औपचारिक शिक्षण घेतलेलीच माणसं उत्तम वत्ते होतात असं नाही. मनापासून आलेल्या भावना लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवणाऱया सिंधुताई सपकाळ, आपल्या कवितेतून लोकांची मनं जिंकणाऱया बहिणाबाई चौधरी यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वं या गोष्टीला नक्कीच दुजोरा देतात.

मुद्दा साधासोपा करून सांगा
आपल्या उच्च शिक्षणाचा प्रभाव आपल्या बोलण्यात जाणवू न देता लोकांच्या पचनी पडेल इतक्या साध्यासोप्या आणि सहज शैलीत बोलावं. विचार करताना विचारवंतासारखा करावा, पण मुद्दा मांडताना मात्र सर्वसामान्य माणसाला समजेल इतका तो साधासोपा आणि सहज करून सांगावा.
तुमचं बोलणं इतकं लाघवी असावं की, समोरच्याला कार्यक्रम संपल्यानंतर हे मनात यावं की, ‘‘अरे! इतक्या लवकर कार्यक्रम का संपला? अजून थोडा वेळ सुरू असता तर ऐकायला मजा आली असती.’’ बोलून झाल्यावर तुम्ही मंचावर उतरताना आज मी माझं सर्वोत्तम दिलं अशी आनंददायी भावना तुमच्या मनात असावी.