
मुंबईच्या अर्थसंकल्पावर महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार टीका केली. सत्ताधारी भाजपने व त्यांच्या प्रशासकांनी आतापर्यंत महापालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी मोडल्या आहेत. त्या ठेवींचा पैसा कुठे खर्च केला याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, आता 36 हजार कोटींच्या ज्या ठेवी मोडल्या जाणार आहेत, त्या नेमक्या कशावर खर्च केल्या जाणार आहेत हेही स्पष्ट करा, असे त्यांनी ठणकावले.
शिवसेनेने महापालिकेची सत्ता सोडली तेव्हा महापालिकेच्या नावे 92 हजार कोटींच्या ठेवी होत्या. मागच्या साडेतीन वर्षांच्या काळात त्यातील अनेक ठेवी मोडल्या गेल्या. त्या कोणत्या कामावर खर्च केल्या गेल्या हे मुंबईकरांना कळायला हवे, असे त्या म्हणाल्या.
बेस्ट उपक्रमाची 1 हजार कोटींवर बोळवण
लोकल ट्रेननंतर मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेली बेस्ट सध्या आर्थिक डबघाईला आली आहे. त्यामुळे भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी बेस्ट प्रशासनाकडून महापालिकेकडे करण्यात येत होती. मात्र, अर्थसंकल्पात बेस्टसाठी केवळ एक हजार कोटी रुपये देण्याचे प्रस्तावित आहे.
करमणूक शुल्काचा दणका
महापालिकेच्या अर्थसंकल्पात नव्या करांचा उल्लेख नसला तरी 2017 पासून बंद करण्यात आलेले करमणूक शुल्क पुन्हा वसूल केले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने करमणूक शुल्कातून दिलेली सूट 30 सप्टेंबरपर्यंतच लागू असेल. ऑक्टोबर 2026 पासून मुंबई महापालिका करमणूक कर गोळा करेल. याबाबत महाराष्ट्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
फेरीवाल्यांना क्यूआर कोड
मुंबईतील फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिकृत फेरीवाल्यांची ओळख पटवण्यासाठी, ओळखण्यासाठी ही प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र होणार आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पैसे वापरले!
लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी पालिकेच्या ठेवींचा वापर करण्यात आल्याची आमची माहिती आहे. सरकारकडून पालिकेचे कोटय़वधी रुपये येणे बाकी आहेत. ते देण्याऐवजी पालिकेचे पैसे सरकार त्यांच्या योजनांसाठी वापरत आहे. आम्ही या सगळय़ाची माहिती घेत आहोत. सत्ताधारी हे नाकारत असतील तर महापालिकेच्या खर्चाबाबत श्वेतपत्रिका काढावी, असे त्या म्हणाल्या.






























































