
>> मीना आंबेरकर
स्वच्छ, सुसज्ज स्वयंपाकघरात आई अन्नपूर्णाही प्रसन्न, आनंदी असते आणि मग तिच्या उपकरणांतून चविष्ट रसवंती थेट आपल्या पानात उतरते.
स्वयंपाकघर म्हटले की, त्यात विविध साधनसामग्री निरनिराळे खाद्यपदार्थ, धान्य, भाजीपाला यांचा समावेश असतो. विविध साधनसामग्री, स्वयंपाकाची उपकरणे विविध अन्नपदार्थांनी युक्त असे स्वयंपाक बनते. अर्थात एवढय़ा सगळय़ा गोष्टी सांभाळणे त्याचा नीट वापर करणे, त्यांची योग्य ती काळजी घेणे हे सर्व त्यात अभिप्रेत असते.तेथे स्वच्छता राखणे हे ओघानेच आले. कारण त्या स्वच्छतेचा थेट आपल्या पोटाशी संबंध असतो. त्याबाबतीत जरा काही कुचराई झाली तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो स्वयंपाकघर स्वच्छ असणे ही सर्वसामान्य व अत्यंत महत्त्वाची बाब आहे. भांडी, डबे वगैरे सामान नीटनेटके व व्यवस्थित योग्य जागी लावलेले असणे अपेक्षित आहे. स्वयंपाकघरातील सामान टापटिपीने ठेवलेले असले म्हणजे ते शोभिवंत दिसते. त्यामुळे एक प्रकारचे प्रसन्न वातावरण निर्माण होते आणि आपल्याला हवी असलेली वस्तू ताबडतोब मिळते. ती शोधण्यात वेळ वाया जात नाही.
स्वयंपाकघरातील ओटा हे स्वयंपाकघराचे केंद्रस्थान आहे. तो स्वच्छ व आवरलेला असणे गरजेचे आहे. ओटय़ाजवळच्या टाईल्स रोज पुसून स्वच्छ कराव्यात कारण अन्नपदार्थ शिजवताना, फोडणी वगैरे देताना त्यावर तेलाचे, अन्नपदार्थांचे शिंतोडे उडून त्या तेलकट होण्याचा संभव असतो. तसेच भिंतीवरील जाळी, जळमटे पंधरा दिवसांतून एकदा साफ करणे आवश्यक आहे. शक्यतो स्वयंपाकघरात भरपूर उजेड व खेळती हवा असावी. आतील अन्नपदार्थांचा वास व धूर उडून जाण्यासाठी एक्झॉस्ट फॅन वापरावा, खिडक्यांना जाळय़ा लावाव्यात म्हणजे माशा, डास यांचा उपद्रव होणार नाही. स्वयंपाकघरातील कपाटे-शेल्फ स्वच्छ असावीत, झुरळे, उंदीर, मुंग्या यांचा बंदोबस्त करणे जरुरीचे आहे. डाळ, तांदूळ, साखर यासारखे अन्नधान्ये सुरक्षित रहाण्यासाठी ती स्वच्छ डब्यात भरून व्यवस्थित कपाटात ठेवावीत. महिन्याचे सामान स्वच्छ करून ठरावीक डब्यात ठरावीक ठिकाणी व्यवस्थित ठेवावे.
वांग्याचे काप
साहित्य – गोल मोठय़ा वांग्याच्या पातळ गोल चकत्या, तिखट मीठ चवीनुसार, तांदळाचे पीठ, तेल, 2 चमचे चिंचेचा कोळ.
कृती – चिंचेच्या कोळात तिखट, मीठ घालून एकजीव करा व हे मिश्रण वांग्याच्या चकत्याला नीट लावून घ्या. नंतर त्या चकत्या तांदळाच्या पिठात घोळवून घ्या. पसरट तव्यावर तेल गरम करून त्यावर चकत्या मांडाव्यात मंद गॅसवर शिजू द्याव्यात. खालून लाल झाल्यावर उलटून दुसऱया बाजूनेही लाल कराव्यात.
रूमाली वडय़ा
साहित्य – 2 कप बेसन, 1/4 कप कणीक, 1 कांदा, 12 लसूण पाकळय़ा, 2 इंच आले, 4 हिरव्या मिरच्या, सारणासाठी 3 टे.स्पून ओले खोबरे, 1 टे.स्पून खसखस, तिखट, 4 लवंगा, 1 इंच दालचिनी, 2 मसाला वेलची, 8 मिरे, मीठ व साखर चवीनुसार.
कृती – थोडय़ा तेलात फोडणी करून त्यात 3 कप पाणी घालून उकळा. त्यात कांदा, लसूण, आले, हिरव्या मिरच्या हा मसाला वाटून घाला. थोडे मीठ घाला. उकळी आल्यावर पीठ घाला. वाफ काढा सर्व पदार्थ एकजीव करा व मळून घ्या. सारणसाठी घेतलेले पदार्थ बारीक वाटून घ्या. पोळपाटावर रूमाल पसरून त्यावर वाफवलेले पीठ घालून थापा. त्यावर तयार सारण घालून रुमालाच्या मदतीने त्रिकोणी वळकटी बनवा. पोळपाट लहान असल्यास हीच कृती 2 वेळा करा. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून तुकडे करून तळा. कापलेल्या तुकडय़ांचा आकार त्रिकोणी असायला हवा.
खांडवी
साहित्य – तांदळाच्या कण्या, पाणी, गूळ, ओले खोबरे, वेलची पूड, साजूक तूप.
कृती – तांदळाच्या कण्या भाजून, धुऊन वाळवाव्यात, मिक्सरवर त्याचा रवा काढून घ्यावा. या रव्यातील दोन वाटय़ा रवा घ्यावा. दीड वाटी पाणी उकळत ठेवावे. उकळी आली की रवा त्यात घालून ढवळावा. जरा फुलून आला की खाली उतरावा. दुसऱया पातेल्यात दोन वाटय़ा पाणी, दोन वाटय़ा चिरलेला गूळ घालून उकळावयास ठेवावे. उकळी आली की त्यात फुललेला रवा घालावा. मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत रहावे. घट्ट होत आले की तीन चार चमचे साजूक तूप घालावे. वेलची पूड घालावी, गरम असतानाच ताटात थापावे, वर ओले खोबरे थापावे. वडय़ा पाडाव्यात खातानाही साजूक तुपाशी खाव्यात.
टीप्स
1) वांग्याचे भरीत करताना वांगे ओले करून तेलाचा हात लावून भाजावे. चांगले भाजले जाते.
2) भाज्या करताना हिंग, हळद भाजी फोडणीला टाकल्यावर घालावे. रुची वाढते.






























































