किचनमध्ये करा डोळसपणे वावर, अंध अन सामान्यांसाठी बनवले खास स्टिकर्स

‘अगं कुठे आहे मुगाची डाळ? सगळे डबे बघून झाले. नाहीच आहे इथे.’
‘अहो, तिथे समोरच तर आहे डबा. कसा सापडत नाही हो तुम्हाला?’

घरोघरी होणारे हे संवाद! यात कधी अगंच्या ऐवजी अगं आई असतं तर अहोच्या ठिकाणी मुलगा/ मुलगी आणि मुगाच्या डाळीच्या ठिकाणी अजून काही! डोळस लोकांना जर स्वयंपाकघरात गोष्टी चटकन सापडत नसतील तर अंध लोकांना किती अडचणी येत असतीन ना… याच विचारातून अंध आणि डोळस अशा दोन्ही लोकांना उपयुक्त ठरतील असे स्वयंपाकघरात वापरता येतील असे स्टिकर्स तयार करण्यात आले आहेत.

ब्रेल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे ‘स्पर्शज्ञान’चे स्वागत थोरात आणि सावी फाऊंडेशनच्या संस्थापक, अध्यक्षा रश्मी पांढरे यांच्या संकल्पनेतून असे स्टिकर्स प्रथमच बनवण्यात आले आहेत. त्यांनी स्वयंपाकघरात लागणाऱया सर्व गोष्टींची बारकाईने यादी करून त्यांच्या नावाचे स्टिकर्स ब्रेल आणि देवनागरीत बनवले आहेत. हे स्टिकर डब्यांवर चिकटून त्यात त्याप्रमाणे जिन्नस भरले की झाले. 8 मार्च रोजी अंध मुलांच्या हस्ते एका घरगुती कार्यक्रमात या उपक्रमाचा शुभारंभ झाला. सध्या स्टिकर्सचे सेट मराठी भाषेत उपलब्ध आहेत. येत्या काळात इंग्रजी आणि हिंदी भाषेतही ते उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

148 जिन्नसांची यादी

लॉकडाऊनच्या काळात गृहिणींव्यतिरिक्त घरातील पुरुष मंडळींनी किचनमध्ये पाय ठेवला आणि आपल्या पाककलेचे कौशल्य दाखवले. त्यावेळी स्वयंपाकघरात कोणत्या डब्यात कोणते जिन्नस आहेत हे शोधणे त्यांच्यासाठी जिकरीचे झाले होते. व्यक्ती अंध असेल तर आणखीच अवघड. त्यामुळे अंध आणि इतरांचा स्वयंपाकघरातील वावर सुकर करावा यासाठी असे स्टिकर्स तयार केल्याचे सावी फाऊंडेशनच्या रश्मी पांढरे यांनी सांगितले. याअंतर्गत साखर, डाळी, कडधान्यं, मीठ-मसाला अशा 148 पदार्थांचा सेट केलाय. त्याची किंमत 110 रुपये ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अंधांबरोबर डोळसांचाही स्टिकर्सना चांगला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत 31 गावांत सुमारे 280 स्टिकर्सचा संच पोचला आहे, अशी माहिती ‘स्पर्शज्ञान’चे स्वागत थोरात यांनी दिली.

ब्रेस स्टिकर्सची संकल्पना खूपच छान आहे. त्यामुळे मला नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली. स्टिकर्समुळे मी स्वयंपाकघरात आईला मदत करू लागले. माझ्यासाठी ते आता स्मार्ट किचन झाले आहे. आता अनेकांची स्वयंपाकघरातील आदळाआपट कमी होईल.
– कुंती शिरसाड, अंध विद्यार्थिनी- सोलापूर

आपली प्रतिक्रिया द्या