
सामना प्रतिनिधी। कणकवली
ढगफुटीसारख्या मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिह्यात धुमशान घातले आहे. देवगड, मालवण, कुडाळ, सावंतवाडीला पावसाने झोडपून काढले आहे. धुवाँधार पावसामुळे कणकवली अक्षरशः बुडाली आहे. गडनदी, जानवली नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे घरे आणि कार्यालयांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कणकवलीचा सर्व्हिस रोड या पावसात वाहून गेला आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱयातील दुकानवाड व उपवडे पुलावर पाणी आल्याने वसोली, आंजिवडे, शिवापूर, उपवडे, दुकानवाड या गावांचा संपर्क तुटला आहे. कुडाळ-पावशीत पूरस्थिती निर्माण होऊन भातशेती पाण्याखाली गेली आहे. कर्ली, पावशी बेलनदी, वेताळबांबर्डे, हातेरी व हुमरमळा पीठढवळ या चारही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बाव, सरंबळ, चेंदवणमध्येही अशीच स्थिती आहे. पावसामुळे वीज, दूरध्वनी आणि वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.
2-4 जुलैला विदर्भ-मराठवाडय़ात पाऊस
बंगालच्या उपसागराकडून येणाऱया एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 2 ते 4 जुलैदरम्यान विदर्भातील बहुतांश भागांत पाऊस पडण्याचा अंदाज हवामानतज्ञांनी वर्तविला आहे. यादरम्यान पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, पूर्व-अमरावती आणि यवतमाळ जिह्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. या जिह्यांच्या तुलनेत विदर्भातील इतर भागांत पावसाचे प्रमाण कमी राहील. यादरम्यान पश्चिम-विदर्भाच्या जवळ असलेल्या संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिह्यातील पूर्व भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. उर्वरित मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात मात्र प्रामुख्याने हलका पाऊस पडेल, असे मत हवामानतज्ञांनी व्यक्त केले आहे. यादरम्यान ढगाळी वातावरणामुळे या सर्व भागांतील तापमान कमी होतील. 4 जुलैनंतर पुढच्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण कमी होईल. 2 ते 4 जुलैदरम्यान नदी-नाल्यांच्या जवळ राहणाऱया नागरिकांनी पुरासारखी स्थिती उद्भवल्यास सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडनदीचा पूल पाण्याखाली
सिंधुदुर्गात शनिवारपासून मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. कणकवलीत तर कहर झाला आहे. शिवडाव येथील गडनदीचा पूलही पाण्याखाली गेला आहे. तहसील कार्यालय, सारस्वत बँक, जळकेवाडी परिसर जलमय झाला आहे. दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामस्थांना कणकवली शहरात जाणेही कठीण झाले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास गडनदीच्या किनारी असलेली गावे आणि वाडय़ांमधील घरांमध्ये पाणी शिरेल अशी परिस्थिती आहे.
भुईबावडा घाटात दरड कोसळली, होडावडे पूल पाण्याखाली
वैभववाडी परिसरातही मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने गगनवाबडा-खारेपाटण घाटमार्ग एकेरी केला गेला आहे. वेंगुर्ल्यात पूरसदृश परिस्थिती असून होडावडे-तळवडे गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला एसटीच्या फेऱया त्यामुळे मातोंडमार्गे वळवण्यात आल्या आहेत.
मालवणात पडझड, लाइट गूल
मालवण तालुक्यात आतापर्यंत 900 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोतेवाडा मार्गावर झाड कोसळून एका हॉटेलचे नुकसान झाले. वीज खांब आणि वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला. मेढा-राजकोट भागात वीज कोसळल्याने अनेक घरांमधील वीज उपकरणांचे नुकसान झाले.


























































