
सी केवायसी CKYC म्हणजेच सेंट्रल नो युवर कस्टमर. सी केवायसी ही जुन्या केवायसीपेक्षा अद्यावत असलेली व्यवस्था आहे. एखाद्या बँकेमध्ये खाते उघडताना केवायसी द्यावे लागते. दुसऱ्या बँकेमध्ये खाते उघडायचे असल्यास त्या बँकेसाठी नव्याने केवायसीसाठी कागदपत्रे द्यावी लागतात. या केवायसीला बँकेपलीकडे जास्त महत्त्व प्राप्त होत नव्हते.
CKYC मुळे जुनी पद्धत ही कालबाह्य झाली असून नवी पद्धत ही अधिक सुलभ, अद्यायावत अशी झाली आहे. इंटरनेट क्रांतीमुळे ऑनलाईन सुविधेमुळे आर्थिक देवाणघेवाणीशी निगडीत विविथ प्रकारची खाती ग्राहकाला हवी तिथे आणि हवी तशी सुरू करता येऊ लागली आहेत. ही खाती उघडत असताना एकाच ठिकाणी माहिती साठवून ठेवली असल्यास एका विशेष नंबरद्वारे आपण नोंदणी करू शकतो. हे सीकेवायसीमुळे शक्य झाले आहे. एखाद्या वित्तीय अथवा बिगरवित्तीय संस्थेशी व्यवहार करताना आपली माहिती, आपली ओळख विशेष नंबरने केवायसी स्वरूपात एका मध्यवर्ती नोंदणीकृत साच्यामध्ये संगणकीकृत किंवा ऑनलाईन साठवलेली असणे म्हणजेच सीकेवायसी होय.
सीकेवायसीची नोंदणी कुठे आणि कशी कराल?
सी केवायसी नोंदणी करण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करण्यात आली असून तिला CERSAI असं म्हणतात. ग्राहक किंवा एखादी व्यक्ती या नात्याने या संस्थेवर किंवा अधिकृत वेबसाईटवर सीकेवायसीची थेट नोंदणी करणे शक्य नाही. अधिकृत नियामक मंडळे उदाहरणार्थ सेबी, भारतीय रिझर्व बँक, आय आर डी ए, पी एफ आर डी ए यांच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या वित्तीय व बिगर वित्तीय संस्थांमार्फत सीकेवायसी नोंदणी करण्याची सोय केलेली आहे.
तुम्ही बँकेचे खाते काढायला गेल्यावर केवायसी जमा करावी लागते. तुमची कागदपत्रे तपासली जातात. अशा वेळेस सध्या एका मध्यवर्ती ठिकाणी (CERSAI) तुमची माहिती साठवली जाते. त्यानंतर काही दिवसांनी तुमचा 14 अंकी KIN नंबर (केवायसी ओळख क्रमांक – KYC IDENTIFICATION NUMBER) बँकेच्या आणि CERSAI प्रणालीमध्ये तयार होतो. हाच तो विशेष सी केवायसी नंबर ज्याच्या सहाय्याने कोणत्याही वित्तीय व बिगर वित्तीय संस्थेमध्ये अथवा पोर्टलवर वेगळ्या प्रकारची नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता भासत नाही. तशा प्रकारचा प्रयत्न केल्यास तात्काळ सूचना प्राप्त होते आणि पुन्हा समावेश करण्यास अटकाव केला जाऊ शकतो.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे तुम्ही बँकेमध्ये खाते उघडताना किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना ‘ सी केवायसी नंबर किती दिवसात मिळेल ‘ याची मार्गदर्शक तत्वे आलेली आहेत. तो लवकरात लवकर मिळण्यासाठी तुमचे वैध आधार कार्ड (त्यावरील नाव आणि पत्ता) , पॅन कार्ड (जन्म तारीख), स्वतःची सही आणि फोटो विहित मुदतीत अचूक माहितीसह सादर करणे गरजेचे आहे, अन्यथा तो लगेच मिळण्याची शाश्वती कमी असते.
सी केवायसी तपशील कोठे तपासाल ?
काही म्युच्युअल फंड कंपन्या किंवा विमा कंपन्या त्यांचे कागदोपत्री कामकाज वेगवेगळ्या माहिती जतन करून ठेवणाऱ्या संस्थांकडे किंवा कंपन्यांकडे सोपवत असतात. उदाहरणार्थ KARVY आणि CAMS. आपण कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकतो तशा प्रकारे ही दोन पोर्टल बऱ्याच अंशी वेगवेगळ्या माध्यमामार्फत माहिती एकत्रित गोळा करून ठेवतात व तपशील देत राहतात. अर्थात हे पोर्टल्स कोणाशी संलग्न आहेत त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
डिजिटल युगात बऱ्याच कारणांमुळे सीकेवायसी ला महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी अनेक वेळा किंवा प्रत्येक वेळेला केवायसी करणे त्रासाचे ठरते. यालाच पर्याय म्हणून एकाच वेळेला मध्यवर्ती माहिती प्रत्येक ठिकाणी लागू व्हावी व अनेक वेळा केवायसी करण्याचा वेळ वाचला जावा हाच यामागचा मुख्य हेतू आहे. कोरा (Quora) या प्रश्नोत्तरांच्या संकेतस्थळावर सीकेवायसीबाबतचे सविस्तर उत्तर सरकारी बँकेत कामाला असलेल्या राहुल पाटील यांनी दिले आहे.
























































